टीबीमुक्त जिल्ह्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत -- जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड-अलिबाग,दि.6(जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी केले.
या बैठकीस जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनिषा चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयेश गोसावी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, WHO Consultant ठाणे सर्कल डॉ. ज्योती साळवे, MO ART Centre डॉ. संदीप रेस्वाल, डापकूचे संजय माने, PLHV प्रतिनिधी संघटना पनवेलच्या प्रिया नारखेडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक स्तर अलिबाग रेश्मी साळुंखे, वैद्यकीय अधिकारी DTC अलिबाग डॉ. सुरेश ठोकळ व डॉ. अक्षयराज राठोड, तसेच दंतराव सतीश, सुभाष भोजने आणि धनंजय पाटील यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. ‘माय भारत’ स्वयंसेवक, तसेच एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांना क्षयरोगाबाबत माहिती देऊन त्यांना या अभियानात सहभागी करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजामध्ये क्षयरोगाची लक्षणे, तपासणी, उपचार आणि प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा.
जिल्ह्यातील क्षयरुग्णांना आवश्यक पोषण मिळावे यासाठी ‘निक्षय मित्र’ मोठ्या प्रमाणात तयार करावेत. सर्व तालुक्यांतील क्षयरुग्णांना फूड बास्केट उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
अतिजोखीम असलेल्या भागांमध्ये घेण्यात येणाऱ्या एक्स-रे शिबिरांचा प्रभावीपणे उपयोग करून क्षयरोगाचे लवकर निदान करावे. तसेच प्रत्येक तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांना थुंकीचे नमुने योग्य पद्धतीने संकलित करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जास्तीत जास्त गावे टीबीमुक्त गावे म्हणून घोषित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
क्षयरोग निर्मूलन हा केवळ आरोग्य विभागाचा कार्यक्रम नसून, संपूर्ण प्रशासन आणि समाजाचा सामूहिक उपक्रम आहे. ग्रामपंचायत स्तरावर क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना नियमित पोषण आहाराची फूड बास्केट उपलब्ध करून दिल्यास रुग्णांच्या उपचारास मोठी मदत होईल. यासाठी ग्रामपंचायतींनी आपल्या निधीतून क्षयरुग्णांसाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला व्यापक लोकसहभाग मिळवून देण्यासाठी सर्व सहकारी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था व कंपन्यांनी पुढे येऊन निक्षय मित्र म्हणून क्षयरुग्णांना फूड बास्केट उपलब्ध करून द्याव्यात. ‘टीबीमुक्त रायगड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
0000000
.jpeg)
Comments
Post a Comment