कबड्डीच्या पंढरीची वारकरी कोकण कन्या रायगडची अभिलाषा

दिनांक :-6 मार्च 2017                                                               लेख क्र.7
कबड्डीच्या पंढरीची वारकरी
 कोकण कन्या रायगडची अभिलाषा


कबड्डीची पंढरी समजल्या जाणारा रायगड जिल्हा.  या जिल्ह्यातील  पेण तालुक्याच्या दिव (मंत्रीबेडी) गावची   कन्या अभिलाषा म्हात्रे ही खऱ्या अर्थाने कबड्डीच्या पंढरीची वारकरी असलेली कोकण कन्या होय.  तिला क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा व अभिमानाचा अर्जुन पुरस्कार मिळाला.
तिच्या  क्रीडा क्षेत्रातील कारर्किदी बाबतचा हा लेख...
 पाटणा म्हणजे पाटली पुत्र बिहार येथे 5 मार्च 2012  रोजी सुरु असलेला कबड्डीचा महिला वर्ल्डकप.   भारत विरुध्द इराण या दोन बलाढय संघातील अंतिम सामना..तमाम भारतीयांच लक्ष या सामन्याकडे.  रायगड जिल्हा तर तहान भूक हरपून या सामन्याकडे डोळे लावून बसलेला.  आणि एकच जल्लोष  भारतीय महिला संघाने कबड्डीचा वर्ल्डकप जिंकला.   संपूर्ण रायगड जिल्हा या विजयाने आनंदी झाला.  कारण यात होती आमची रायगडची कन्या अभिलाषा म्हात्रे.   स्पर्धेत तिचा खेळही प्रशंसनीय होता.  वर्ल्डकप जिंकण्यात दाखविलेली कामगिरी ही अत्यंत अतुलनीय ठरली.  आपल्या राज्य शासनानेही 1 कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला.
त्यानंतर एका पाठोपाठ एक अशी यशाची शिखरे पार करत  तिने उत्कृष्ट कामगिरी केली.  2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व करुन भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.   2006 ते 2011 या काळात मध्य रेल्वेच्या संघात खेळतांना अनेक वेळा या संघाला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा होता.  सन 2014 मध्ये एशियन गेममध्ये खेळतांना सुवर्ण पदक मिळूवन दिले.    
या खेळाच्या कामगिरीमुळे तिला सुरुवातीला सेंट्रल रेल्वेत  वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली.    नोकरी करत असतांना तिला खेळाविषयीचे वेड स्वस्त बसून देत नव्हते.   काम आणि खेळ याचा  सुंदर मिलाप करत तिने आपली दिनचर्या सुरुच ठेवली आणि   कबड्डी स्पर्धेत नेत्रदिपक यश संपादन केले.  हेच तिच्या यशाचे खरे गमक होय.  2015 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळाला.  राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया अभिमानाने व गौरवाने तिने हा पुरस्कार स्वीकारुन महाराष्ट्राचा नाव लौकिक वाढविला.     हा पुरस्कार मिळविणारी कोकणातील पहिली सुकन्या होय. 
अभिलाषाने प्रो कबड्डी लिग रायगड व पुणे येथे  पार पडलेल्या  महा कबड्डी लिगमध्ये सहभाग घेतला होता.   सध्या अभिलाषा नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.  
      या सर्व यशाचे खरे श्रेय तिने वडील शशिकांत व आईला दिले असून त्यांनीच   मला हवे असलेले प्रोत्साहन दिल्यामुळे खेळातील यश मिळू शकले हे ती अभिमानाने सांगते.
0000000 
                          हिरामण भोईर                                                                 
                           जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग                                                                      

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड