गणेशोत्सव 2017 पूर्वतयारी आढावा बैठक सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
अलिबाग दि.15,(जिमाका)- गणेशोत्सव काळात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष
रहावे. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास प्रतिसादासाठी प्रशासकीय यंत्रणांचा
परस्पर समन्वय आवश्यक आहे. हा समन्वय राखून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांनी
नागरिकांना सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज
येथे दिले.
आगामी गणेशोत्सव 2017 च्या
पार्शवभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आदितीताई
तटकरे, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,
जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ.देसाई, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक
मनोज म्हात्रे, विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता फारुख शेख, कार्यकारी अभियंता
माणिकलाल तपासे तसेच सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी
गणेशोत्सव काळात दिनांक 23 ऑगस्ट ते दिनांक 6 सप्टेंबर या काळात राष्ट्रीय
महामार्गावरील वाहतूकीचे नियोजन सादर करण्यात आले. तसेच महामार्गावरील व अन्य
रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, वाहतूकीसाठी रस्ते सुरळीत करणे, दरड कोसळणाऱ्या
संभाव्य स्थळांच्या ठिकाणी जेसीबी व अन्य यंत्र सामग्री तयार ठेवणे. रस्ते दुभाजक
बसविणे, वारंवार वाहतूकीची कोंडी होणाऱ्या
ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे. महामार्गावरील तसेच सभोवतालचे
ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवणे, जादा औषधसाठा व मनुष्यबळ
उपलब्ध ठेवणे, पनवेल, पेण, माणगाव, महाड येथे मोबाईल वैद्यकीय पथक सज्ज ठेवणे, गणेशोत्सवा
दरम्यान विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेणे. महामार्ग व ग्रामीण
भागात ट्रान्सफार्मरवर लाईनमनची नियुक्ती करणे, सार्वजनिक मंडळांना तात्पुरत्या
स्वरुपात विज पुरवठा देणे, महामार्गावर रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे, महत्वाच्या
ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे,
नो-पार्किंग झोन घोषित करणे, अतिक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा होणार नाही
याची दक्षता घेणे आदि उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.
गणेशोत्सवाचे
कोकणातील भाविकांमध्ये असलेले धार्मिक महत्व लक्षात घेता, मुंबईहून कोकणाकडे
जाण्यासाठी पर्यायी मार्गाची माहिती ही यावेळी देण्यात आली.
मुंबईहून
कोकणाकडे जाणारे मार्ग-
मुंबई-पनवेल-महाड (राष्ट्रीय महामार्ग क्र.66),
मुंबई-वाशी-पामबीच-उरण फाटा-खारपाडा-वडखळ-महाड, मुंबई-खालापूर टोलनाका-पेण-महाड,
मुंबई-खालापूर -पाली फाटा-वाकण, माणगाव-महाड, मुंबई-सातारा-उंब्रज-पाटण-चिपळूण,
मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर-मलकापूर-अंबाघाट,
मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरी मार्गे कणकवली,
मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे-कणकवली, मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली
मार्गे सावंतवाडी, मुंबई-पनवेल-वडखळ-पेझारी-नागोठणे- महाड
राष्ट्रीय
महामार्गवरील अवजड वाहतूक बंदचे वेळापत्रक-
दिनांक 23 ऑगस्ट
मध्यरात्री पासून ते दिनांक 25 ऑगस्ट रात्री 8 वाजे पर्यंत मुंबई-गोवा या
राष्ट्रीय महामार्गावर ज्या वाहनांची वहन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक आहे
अशा वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
दिनांक 31 ऑगस्ट सकाळी 8
वाजे पासून ते दिनांक 1 सप्टेंबर रात्री 8 वाजे पर्यंत ज्या वाहनांची वहन क्षमता 16 टन किंवा
त्यापेक्षा अधिक आहे अशा वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
दिनांक 5 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपासून
ते दिनांक 6 सप्टेंबर रात्री 8 वाजे
पर्यंत ज्या वाहनांची वहन क्षमता 16 टन
किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
दिनांक
26 ऑगस्ट सकाळी 8 वाजे पासून ते दिनांक 6 सप्टेंबर रात्री 8 वाजे पर्यंत ज्या वाहनांची वहन क्षमता 16 टन किंवा
त्यापेक्षा अधिक आहे अशा वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
दिनांक
23 ऑगस्ट मध्यरात्री पासून ते दिनांक 6 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत राष्ट्रीय
महामार्गावरुन गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.
०००००
Comments
Post a Comment