‘आत्मा ’चा उपक्रम : शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती गट प्रर्वतक प्रशिक्षण






अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29:- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रसायनयुक्त शेतीपासून परावृत्त होऊन नैसर्गिक पद्धतीच्या सेंद्रीय शेतीकडे वळून विषमुक्त अन्न,धान्य,भाजीपाल्याच्या उत्पादनाकडे वळावे यासाठी कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)मार्फत आज सेंद्रीय शेती गट प्रर्वतक प्रशिक्षण पार पडले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद् घाटन अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.बी.शेळके, आत्माचे प्रकल्पसंचालक एम.एस.डावरे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी भारत नांदगांवकर,चिफ मॅनेजर मंदार वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना आ.पंडितशेठ पाटील म्हणाले की, सेंद्रीय शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन पिके सुचवावीत. शेतकऱ्यांनी बाजारात सेंद्रिय मालाला असणारी मागणी लक्षात घेऊन उत्पादन घ्यावे. बाजाराच्या मागणीनुसार पुरवठा करुन आर्थिक फायदा करुन घ्यावा.शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारे घेण्यासाठी शासनाने बँकांना कर्जफेडीची हमी  घ्यावी, अशी सूचना आ.पाटील यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की,शेतकऱ्यांनी शासनाच्या‘ मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घ्यावा. पिक विमा योजनेत सहभागी व्हावे. आपल्या पिकाला पाण्याचे आणि आर्थिक संरक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतांना प्रात्य् क्षिकावर भर देऊन, तालुका स्तरावर मेळावे आयोजित करावे, अशी सुचनाही आ.पाटील यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्मा प्रकल्प् संचालक डावरे यांनी केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले असून यातून शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येणार आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सेंद्रिय शेती प्रशिक्षण संस्था रत्नागिरीचे संदिप कांबळे, विनोद निमाकाळे, हेमंत गुरसाळे, प्रकल्प् उपसंचालक डि.एस.चव्हाण आदी तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.
या उद्घाटन सत्रात रोहा येथील गट प्रर्वतक जोशी, महाड येथील सिताराम कडू या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त् केले. सुत्रसंचालन  व आभार प्रदर्शन प्रकल्प् उपसंचालक डी.एस.चव्हाण यांनी केले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड