ओखी चक्रीवादळः जिल्ह्यातील 243 बोटी सुखरुप परतल्या :किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
अलिबाग,जि. रायगड, दि.4,(जिमाका)- ओखी चक्रीवादळाच्या
पार्श्वभूमिवर प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या पूर्वसूचनेनुसार
जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध बंदरांतून मासेमारीसाठी
समुद्रात गेलेल्या बोटींपैकी 243 बोटी किनाऱ्यावर सुखरुप परतल्या असून उर्वरित सात
बोटी परतीच्या प्रवासात आहेत. दरम्यात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा
परिस्थितीवर निरंतर लक्ष ठेवून आहे. सर्व प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणा सज्ज आहेत.
यासंदर्भात जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहिती नुसार, ओखी चक्रीवादळाचे मार्गक्रमण
समुद्रातून गुजराथ किनाऱ्याकडे सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील
जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पुढील 48 तासात वादळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी
प्रती तास राहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे. आज( सोमवारी) दुपारी 12 वा. चार मिटर पर्यंत भरती आली होती. त्या
काळात कोणताही अनुचित घटनेचे वृत्त नाही. मध्यरात्रीनंतर (मंगळवारी) पहाटे एक वा.
पुन्हा 5 मिटर भरती येणार आहे. या काळातही सखल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला
आहे. सर्वत्र गस्त घालण्याचे काम सुरु आहे.
सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना परस्पर समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून
आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरुन
समुदरात गेलेल्या 250 बोटींपैकी आज (सोमवारी) दुपार पर्यंत 243 बोटी किनाऱ्यावर
सुखरुप परत आल्याची माहिति आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. जिल्ह्यातून गेलेल्या बोटी याप्रमाणे- रेवस
जेट्टी 8, जुनी आरसीएफ जेट्टी -2, थळ नवगाव 122, दादर 1, अलिबाग 15, रेवदंडा-1- 12, रेवदंडा -2- 8, साळाव-2,
नांदगाव-16, आगरदांडा 2, राजपुरी 6, दिघी पोर्ट जेट्टी 14, जीवना बंदर 40, मांदाड
-2 अशा एकूण 250 बोटी समुद्रात गेल्या होत्या. त्यातील आता 243 बोटी परतल्या आहेत
आणि उर्वरित सात परतीच्या प्रवासात आहेत. या बोटींशी मच्छिमार संस्थांच्या
माध्यमातून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संपर्क करुन परत बोलावण्यात आले. सर्व
बोटींशी संपर्क प्रस्थापित झाला आहे. असे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात
आले.
दरम्यान जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर सागरी
पोलीस गस्त घालत असून बंदर निरीक्षक व मत्स्य
व्यवसाय अधिकारी हे ही स्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. किनाऱ्यावरील मासेमारी, पर्यटन, दळणवळण, वॉटर
स्पोर्ट विषयक सर्व उपक्रम पुढील सुचना येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले
आहेत.चक्रीवादळाचा धोका कमी होईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा तसेच
किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याच्या वेगामुळे
झाडे पडून जीवित व वित्त हानीची शक्यता विचारात घेऊन नागरीकांनी दक्षता घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत
संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141
222097/222118 /9763646326 तसेच टोल फ्री नंबर 1077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. विजय सूर्यवंशी
यांनी केले आहे.
00000

Comments
Post a Comment