जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक :पर्यटकांसाठी समुद्र किनाऱ्यावर 'कोस्टल सेफ्टी पेट्रोलिंग' संकल्पना राबवा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी




अलिबाग, जि. रायगड, दि.1- अलिबाग व परिसरात समुद्र किनाऱ्यावर  पर्यटकांची गर्दी होत असतांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने स्वयंसेवकांची 'कोस्टल सेफ्टी पेट्रोलिंग' ही संकल्पना राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, अपर पोलीस अधिक्षक  संजयकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. एस.ए. देसाई तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  सागरकुमार पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी  म्हणाले की,  जिल्ह्यातील  पर्यटन स्थळी  विशेषतः समुद्र किनारी पर्यटक हे लांब पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकेदायक पातळीपर्यंत ते जाऊ नये म्हणून समुद्र किनारी  कोस्टल सेफ्टी पेट्रोलिंग सुरु करण्याची संकल्पना राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.  त्यासाठी शहरातील  महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना, आरएसपी, स्काऊट, एनसीसी  यासारख्या संस्थांमधील विद्यार्थ्यांची मदत घेणे, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या महिला व पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने ही संकल्पना राबवावी, अशी सुचनाही डॉ. सूर्यवंशी यांनी केली.
 या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्य्वस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनूसार जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. आता हा आराखडा राज्य  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.  तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी  ग्रामपंचायत केंद्र बिंदू मानून 'आपत्ती पुर्व, आपत्ती दरम्यान व आपत्ती नंतर' या आधारावर संगणक प्रणाली व मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास सादर करण्यासही मान्यता देण्यात आली. त्याच सोबत जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचा 'बीच प्रोफाईल' तयार करणे आदी विषयांवर चर्चा करुन मान्यता देण्यात आली. जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण  कक्षात  नेमणूक प्रसंगी अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागप्रमुखांनी कठोर कारवाई करावी असे निर्देशही डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार  प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलिपॅड बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड