विशेष वृत्तः रायगड जिल्हा पोलीस भरतीः अधिक हायटेक अधिक पारदर्शक
अलिबाग, जि. रायगड, दि.15 (जिमाका)- सध्या अलिबाग येथे राबविण्यात
येत असलेली पोलीस भरती प्रक्रिया ही जिल्हा
पोलीस दलाने आधुनिक तंत्राचा वापर करुन अधिकाधिक पारदर्शक केली आहे. त्यामुळे संभाव्य
गैरप्रकारांना आपोआप आळा बसेल, असा पोलीस दलाला विश्वास आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलासाठी सध्या भरती प्रक्रिया
राबविण्यात येत आहे. या भरतीत 109 पदे भरली जाणार आहेत. त्यात 76 पुरुष व 33 महिला
पोलीस भरती होणार आहेत. त्यासाठी एकूण 12 हजार
55 जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत. सोमवार
दि.12 मार्च पासून सुरु झालेली ही भरती प्रक्रिया 21 मार्च रोजी संपणार आहे. त्यानुसार
दररोज 1200 तर शेवटच्या दोन दिवसात 1500 उमेदवारांची
चाचणी घेण्याचे नियोजन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. भरती प्रक्रियेत शेवटच्या दिवशी
माजी सैनिक आणि महिलांची चाचणी घेण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक
शारिरीक चाचण्या पोलीस कवायत मैदानावर
पार पाडल्या जात आहेत. त्या प्रक्रियेसाठी दोन उपअधिक्षक, 30 सहाय्यक पोलीस
निरीक्षक आणि 222 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
शारिरीक चाचणीसाठी पहाटे पाच वाजेपासून प्रक्रिया
सुरु केली जात आहे. उमेवाराची छाती, उंची तपासून
नंतर कागदपत्रांची तपासणी होते. त्यानंतर उमेवाराचे
दोन्ही हाताचे बायोमेट्रिक ठसे घेतले जातात.
त्यानंतर उमेदवाराला क्रमांक दिला जातो. यामुळे डमी उमेवाराचा धोका संपुष्टात
आला आहे. या शिवाय उमेवाराच्या चेस्ट नंबरच्या
मागील बाजूला (RFID) आयडी चीप बसविण्यात आली आहे. या चीपचा वापर धावण्याच्या चाचणीसाठी
विशेष करुन केला जाणार आहे. या व्यतिरिक्त संपुर्ण भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेराच्या
निगराणीत होत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया हायटेक आणि अत्यंत पारदर्शक होणार आहे.
भरतीसाठी आलेले उमेदवार हे राज्यातील सर्व भागातून
आलेले असून त्यांच्यासाठी निवास, पाणी-स्वच्छता आदी सुविधा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून
पुरविण्यात आल्या आहेत. शिवाय मैदानावर वैद्यकीय
उपचाराची सुविधा आहे. तसेच सर्व उमेदवारांना पिण्याचे पाणी, पुरक आहार म्हणून दोन बिस्कीट
पुडे दिले जातात.
मैदानावर व मैदानाबाहेरही आलेल्या सर्व
उमेदवारांसाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. ही संपूर्ण
भरती प्रक्रिया जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात राबविली जात
आहे.
०००००
Comments
Post a Comment