प्रलंबित प्रकरणी अन्न औषध विभागाची कारवाई दोषी अन्न व्यावसायिकांकडून सव्वा सहा लाखांचा दंड वसूल
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- अन्न
सुरक्षा व मानदे कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी
नियमित हजर न राहणाऱ्या अन्न व्यावसायिकांच्या प्रलंबित प्रकरणांच्या
निपटाऱ्यासाठी सहआयुक्त अन्न शिवाजी देसाई यांनी पेण येथे शिबिर घेतले. या
शिबिरामुळे दोषी अन्न व्यावसायिकांकडून सहा लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात
आला.
या संदर्भात पेण येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दि.तु. संगत यांनी
दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 हा 5 ऑगस्ट 2011 पासून संपूर्ण
राज्यात लागू झालेला आहे व त्याची अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात यशस्वीपणे अन्न व
औषध प्रशासन म.रा.रायगड तर्फे करण्यात येत आहे.
मानदाप्रमाणे नसलेले अन्न नमुने, लेबल दोष युक्त अन्न नमुने तसेच परवाना अटीचे पालन न केल्याप्रकरणी
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न व्यावसायिकांविरुध्द
न्यायनिर्णयाकरिता मा.सहआयुक्त (अन्न) तथा न्यायनिर्णय अधिकारी,
अन्न व औषध प्रशासन ठाणे यांच्याकडे कलम 68 नुसार प्रकरणे दाखल करण्यात आली
आहेत. सदर दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये
अन्न व्यावसायिक सुनावणीसाठी नियमित हजर राहत नसल्यामुळे बरीच प्रकरणे निकालाकरिता
प्रलंबित असल्याने शिवाजी देसाई सहआयुक्त (अन्न) तथा न्यायनिर्णय अधिकारी, अन्न व औषध
प्रशासन ठाणे यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रकरणांचा निपटारा
जिल्ह्यातच जाऊन करण्याचा एक अनोखा प्रयोग सुरु केला व त्याचाच एक भाग म्हणून 10
डिसेंबर रोजी पेण कार्यालयात शिबिर घेऊन जिल्ह्यातील न्यायनिर्णय प्रकरणे निकाली
काढली व रुपये 6 लाख 25 हजार दंड दोषी अन्न व्यावसायिकांना ठोठावण्यात आला. यावेळी
एकूण 58 प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आली.
सदर सुनावणी दरम्यान मानदाप्रमाणे नसलेले अन्न नमुने, लेवल दोष युक्त अन्न
नमुने तसेच परवाना अटींचे पालन न केल्या प्रकरणी दोषी आढळलेल्या 17 अन्न
व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात मानदाप्रमाणे नसलेले व लेबल
दोषयुक्त अन्न नमुने 8 प्रकरणी रुपये 2 लाख 5 हजार परवाना अट क्र.14 चे उल्लघंन
केल्यामुळे 8 प्रकरणी रुपये चार लाख व तपासणी वेळी दोष आढळून आलेल्या प्रकरणी
रुपये 20 हजार असा एकूण रुपये 6 लाख 25 हजार दंड ठोठावण्यात आला आहे. या सुनावणी प्रकरणी प्रशासनाचे अन्न सुरक्षा
अधिकारी उदय लोहकरे व रावसाहेब समुद्रे यांचे सहकार्य लाभले.
जिल्ह्यातील ज्या अन्न व्यावसायिकांच्या विरुध्द
न्यायनिर्णयाकरिता दाखल केलेले प्रकरणे प्रलंबित असतील अशा अन्न व्यावसायिकांनी
न्यायनिर्णयाकरिता व आपली बाजू मांडण्याकरिता 15 जानेवारी 2019 रोजी पेण
कार्यालयात सुनावणीसाठी न चुकता हजर रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व
औषध प्रशासन (म.रा.) पेण दि.तु.संगत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment