‘वाचन वेल्हाळ’ संस्कृती निर्माण व्हावी- डॉ. आरती सूर्यवंशी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- आपली संस्कृती ही पूर्वापार गोष्टीवेल्हाळ संस्कृती आहे. आता या संस्कृतीचे रुपांतर हे ‘वाचनवेल्हाळ’ संस्कृतीत व्हावे, असे प्रतिपादन ‘डिजीटल वाचन’ या विषयावरील परिसंवादात डॉ. आरती सूर्यवंशी यांनी केले.
रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘डिजीटल वाचन’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी  मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. श्रीमती आरती विजय सूर्यवंशी, या होत्या.
 या सत्रात  सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनीही आपले विचार मांडले. त्यात त्यांनी ग्रंथोत्सव आयोजना मागील शासनाची भूमिका विषद करतांना  सांगितले की, या आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांना आणि वाचकांना मान्यवरांचे ग्रंथ वाचनाविषयीचे विचार अभ्यासपूर्ण विचार ऐकता यावे हा होता. त्यादृष्टीने हा ग्रंथोत्सव यशस्वी झाला असे मत त्यांनी व्यक्त केले.
 तर ठाणे येथील तज्ज्ञ वक्ते अमृत देशमुख  यांनी  सांगितले की, डिजीटल वाचन हे मुक्त आणि सर्वकाळ उपलब्ध आहे.  प्रत्यक्षात मोबाईल आणि त्यावरुन सोशल मिडिया साईट्स वेगवेगळे ॲप यांचा किती वापर करावा याचे भान असणे आवश्यक आहे. मानवी मेंदू हा एकाच वेळी अनेक कामे करु शकत नाही. प्रत्यक्षात आताच्या मोबाईल गॅजेट्स मुळे  आपण वाहवत जाऊन वेगवेगळे कामे करत असतो. त्यामुळे विस्कळीत पणा आला आहे. प्रत्यक्षात मेंदू हा एका विशिष्ट कामावर लक्ष केंद्रीत करुन कामगिरी करण्यासाठी आहे. मात्र तसे होत नाही.  इंटरनेट, सोशल साईट्स यांचा वापर करणे हे एखाद्या व्यसनाप्रमाणे आहे. त्याचा वापर किती करावा याचे भान असणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे अमली पदार्थ व्यसनांत मेंदूतून डोपामाईन या संप्रेरकाचा स्त्राव होतो आणि आनंदाची अनुभूती होते त्याप्रमाणे सोशल साईट्स वापरतानाही होत असते, असे संशोधन आहे. तथापि याच व्यासपीठाचा वापर करुन डिजीटल वाचनाची चळवळ चालविता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले . त्यांचे स्वतःचे 10 लाख लोकांशी जोडलेले डिजीटल वाचनाचे प्लॅटफॉर्म आहे.
अध्यक्षीय समारोपात डॉ. आरती सूर्यवंशी म्हणाल्या की,  आजच्या काळात पुस्तक वाचणाऱ्यांना ‘ग्रंथवीर’ म्हणायला हवे, आपल्या बालपणातील वाचनाच्या आठवणी सांगून डॉ. सुर्यवंशी म्हणाल्या की, ग्रंथांशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. मुलांना वाचनाची आवड लावण्यासाठी आई वडीलांनी परिश्रम घ्यायला हवे.  किशोरावस्थेनंतर संगणक हाताळणारे व्यक्ती  हे ई- वाचन सहज करु शकते.  ई- वाचनाचे अनेक फायदे आहेत. त्यात आपण पर्यावरणाचे होणारी हानी वाचवत असतो.  त्याची ने आण करणे अत्यंत सोपे आणि कमी वेळात होणारे आहे.  हे फायदे असतांनाच दुसरीकडे त्याचे तोटे असे आहेत की, लहानपणापासून संगणक किंवा डिजीटल वाचन करणाऱ्यांची नंतर वाचनाची क्षमता कमी होते. वाचनाचा वेग आणि अचूकता ही उत्तरोत्तर वाढवायला हवी मात्र तसे होतांना दिसत नाही. अधिकाधिक डिजीटल  गॅजेटसचा वापर हा घातकच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुस्तकातील अक्षरे व चित्र मुलांना वेगळ्या भावविश्वात नेऊन त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देतात. चित्रांमुळे भावना ओळखणं आणि त्या व्यक्त करणं मुलं शिकतात. भावना व्यक्त न करता आल्याने नातेसंबंध दुरावतात हा त्याचा दुसरा दुष्परिणाम होतो असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार वाचन करा, कारण पुस्तक जितकं जुनं तितकं ते अधिक अनमोल असतं, असेही त्यांनी सांगितले. मोठे पणी आपण कसे बनतो? याचे उत्तर बालपणी ऐकलेल्या गोष्टीत दडलेले असते, त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला गोष्टी सांगण्यासाठी आपली संस्कृती ही वाचन वेल्हाळ व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन अजित पवार  यांनी केले. तर  डी.बी. वळवी यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड