जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक: वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.11- जिल्ह्यात विविध मार्गांवर 42 अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक
स्पॉट) परिवहन विभागाने नोंद केली आहेत. वाहतुक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर
परिवहन व पोलीस विभागाने भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
यांनी आज येथे दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची
बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी
पाटील, पेण येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार,सार्वजनिक बांधकाम
विभाग महाड चे उप अभियंता व्ही. आर. बागुल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता
रुपेश सिंगासने, जि.प बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता मृदुला दांडेकर आदी उपस्थित
होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात विविध
मार्गांवर (राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग इ.)42 ठिकाणे अपघात प्रवण म्हणून
नोंदविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आढावा यावेळी सादर करण्यात
आला. त्यानुसार, सन 2017 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 754 अपघात झाले
होते. त्यात 181 व्यक्ती मृत झाल्या असून 698 व्यक्ती जखमी झाल्या. याच कालावधीत
सन 2018 मध्ये 798 अपघात झाले, त्यात 233 व्यक्ती मृत झाले तर 865 व्यक्ती जखमी
झाले आहेत.
अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असुन वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर
द्यावा, अशी सुचना मांडण्यात आली. दुचाकी वाहनधारकांचा हेल्मेटचा वापर करण्यात
हलगर्जीपणा, जादा क्षमतेने प्रवासी व मालवाहतूक,
बेदरकारपणे वाहन चालविणे, सिटबेल्टचा वापर न करणे, मद्यपान करुन वाहन चालविणे,
वेगमर्यादा पालन न करणे आदी कारणांमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असतात.
त्यासाठी रस्ते वाहतुक नियमांची काटेकोर
अंमलबजावणीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
तसेच नोंदविण्यात आलेल्या ब्लॅक
स्पॉटवर गतिरोधक बसविणे, रंबलिंग स्ट्रीप्स बसवणे, धोक्याचा इशारा देणारे फलक
उभारणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
याशिवाय येत्या 31
डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर मद्यपान करुन वाहन चालविल्याबाबतची कसून तपासणी करावी.
वेगमर्यादेचे काटेकोर पालन व वाहतुक सुरक्षा उपाययोजनांचे पालन काटेकोर व्हावे,असे
निर्देश देण्यात आले. तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ
नये. त्यासाठी आता पालकांवर कारवाई होत असते, हे ध्यानात घ्यावे. अतिवेगाने वाहन चालविल्यास वाहन चालकाचा परवाना
तीन महिने कालावधीसाठी निलंबित होतो. तर मद्यपान करुन वाहन चालविल्यास सहा
महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित होतो. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयातून
समुपदेशन व उपचार घेणे आवश्यक असते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
Comments
Post a Comment