अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु
रायगड-अलिबाग,दि.9 जून (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, यामाहा शोरुम, आर.सी.एफ.गेटसमोर, वेश्वी अलिबाग येथे कार्यरत आहे. या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छूक विद्यार्थींनींनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अलिबाग श्रीमती उषा शशिकांत गुजेला यांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती 85 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थीनी 5 टक्के व विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.
अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.1300/- निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र महा.विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त रेनकोट, छत्री भत्ता, संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडा साहित्य,मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थीनींकरिता रूपये 2 लाख 50 हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थीनींकरिता रू.1 लाखाचे आत असावे. शालेय विद्यार्थींनी प्रवेशाकरिता अर्ज सादर करावयाचा दि.30 जून 2026 पर्यंत तर इयत्ता 11 वी व 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थींनी प्रवेशाकरिता अर्ज सादर करावयाचा दि.15 जुलै 2026 पर्यंत आहे.
प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2025-26 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक,आधारकार्ड, शाळा/कॉलेजचे बोनाफाईड, रेशनकार्डची या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच https://hmas.mahait.org, या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिक माहितीकरिता गृहपाल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह सौ.यु.एस.गुजेला (मो.8767339974) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल सौ.यु.एस.गुजेला यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment