शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व महामंडळाच्या इतर 13 उपकंपन्यामार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरीता इतर मागासप्रवर्गातील गरजू व होतकरु व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे रायगड जिल्ह्याकरीता भौतिक व आर्थिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. या ऑनलाईन योजनांमध्ये 20 टक्के बीज भांडवल योजना व 1.00 लक्षपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे.
रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजनेकरिता अर्जदाराचा सिबिल क्रेडीट स्कोर हा किमान 500 असणे बंधनकारक आहे. सर्व ऑनलाईन योजनांसाठी सर्वप्रथम महामंडळांच्या www.msobcfdc.org, या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करुन घ्यावी. अर्जदाराने स्वतःच्या जातप्रमाणपत्रातील नमूद जातीनुसार लागू असलेले महामंडळाच्या उपकंपनीमध्ये जाऊन आवश्यक ती योजना निवडावी. तद्नंतर अर्जदाराने महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या PDF सुस्पष्ट प्रती पोर्टलवर अपलोड करावी. अर्ज स्विकारण्याची संपूर्ण प्रक्रीया ऑनलाईन प्रणालीद्वारे असेल. याकरीता जिल्हा कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संपर्क साधल्यास अर्जदाराला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाचा पत्ता -जिल्हा कार्यालय श्रीराम समर्थ सहकारी गृह. संस्था मर्या., रुम नं. 101, पहिला मजला, चेंढरे, हनुमान मंदिराच्या मागे, ता. अलिबाग, जि. रायगड, (02141-224448), संकेतस्थळ :- www.msobcfdc.org, येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे.
20 टक्के बिज भांडवल कर्ज योजना- भौतिक उद्दिष्ट 18, आर्थिक उद्दिष्ट (रु.लाखात) 9.00. थेट कर्ज योजना (1 लक्ष)- भौतिक उद्दिष्ट 160, आर्थिक उद्दिष्ट (रु.लाखात) 160.00. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- भौतिक उद्दिष्ट 125, आर्थिक उद्दिष्ट (रु.लाखात) 187.50. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- भौतिक उद्दिष्ट 49, आर्थिक उद्दिष्ट (रु.लाखात) 29.40. गट कर्ज व्याज परतावा योजना- भौतिक उद्दिष्ट 44, आर्थिक उद्दिष्ट (रु.लाखात) 61.60.महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना- भौतिक उद्दिष्ट 50, आर्थिक उद्दिष्ट (रु.लाखात) 3.00.
000000
Comments
Post a Comment