धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी
रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- दि.01 सप्टेंबर ते दि.15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची वेळेत पूर्तता करुन आपली ऑनलाईन नोंदणी धान खरेदी केंद्रावर करुन घ्यावी व किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.रविंद्र शेळके यांनी केले आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, म्हणून ही योजना राबविण्यात येते. हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना लाभ मिळावा या हेतूने राज्यात धान/भरडधान्य खरेदी केंद्र सुरु केली आहेत.
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासनाकडे धान्य विक्री करु इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतक-यांनी आपले धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यापूर्वी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आधारकार्डशी संलग्न बँक खाते असलेला क्रमांकच ऑनलाईन नोंदणीसाठी वापरणे आवश्यक आहे. AGRISTACK या संकेतस्थळावरील शेतकरी क्रमांक (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे या बाबी आवश्यक आहेत.
00000
Comments
Post a Comment