पनवेल आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘MH46DG’ नवीन मालिका आकर्षक क्रमांकांसाठी 17 फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार
रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DG ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्याकडून करण्यात आले आहे.
अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (DD), निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती खाजगी वाहन विभागात जमा कराव्यात.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी दि. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अर्जदारांनी दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी इच्छित जास्तीच्या रकमेचा डीडी बंद लिफाफ्यात जमा करणे आवश्यक राहील. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (नवीन वाहन नोंदणी विभाग) यांच्या दालनात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
अर्जदारांना सर्वसाधारण सूचना पुढीलप्रमाणे :- डिमांड ड्राफ्ट ‘RTO PANVEL’ यांच्या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्ड, ई-आधारकार्ड व पत्त्याचा पुरावा साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी सिलबंद पाकिटात सादर करावा. विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचा किंवा दोन महिन्यांपेक्षा जुना डीडी स्वीकारला जाणार नाही. एकदा राखीव ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव दिनांकापासून 180 दिवसांत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी शासन जमा होईल. आकर्षक क्रमांकासाठी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत अथवा समायोजित केली जाणार नाही. चालू मालिका पूर्ण झाल्यानंतरच नवीन मालिका सुरू होणार असून, आगाऊ स्वीकारलेल्या अर्जांच्या पावत्या जुन्या मालिकेतील क्रमांक संपल्यानंतरच जारी केल्या जातील. आकर्षक क्रमांकाबाबत अधिक माहितीसाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
0000000
Comments
Post a Comment