मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 चे सुधारित वेळापत्रक जाहीर अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार

 

 रायगड-अलिबाग, दि.20(जिमाका):भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (ASDD) प्रवर्गातील मतदारांसाठी गणना अर्ज सादर करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच गणना अर्ज वितरण व संकलन आणि त्यानंतरच्या पुनरीक्षण प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी दि. 22 डिसेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांनी  दिली आहे.

 भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या दि. 17 नोव्हेंबर 2026 रोजीच्या तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडील दि.18 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार हे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार गणना अर्ज तयार करणे व छपाई करण्याची प्रक्रिया दि.18 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गणना अर्जांचे वितरण व संकलन दि. 18 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत करण्यात येईल, तर प्राप्त गणना अर्जांचा निपटारा दि. 10 डिसेंबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पुनरीक्षण कामकाजाच्या सूचना टप्प्यातील दावे व हरकतींचा निपटारा दि. 31 ऑगस्ट ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. 22 डिसेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल.

 भारत निवडणूक आयोगाच्या दि.06 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार, सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या मतदारांना गणना अर्ज देण्यात आले होते; मात्र त्यांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) या प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            यासाठी अशा सर्व मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या मतदान केंद्रांवरील मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत, त्या संबंधित मतदान केंद्रांचे सूचना फलक, पंचायत भवन, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच गटविकास अधिकारी, पंचायत अधिकारी आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत या याद्या लावण्यात येतील. तसेच संबंधित मतदारांची नावे समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणे नमूद करून या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर वाचनीय पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील.

अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सामान्य निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (ERO/AERO) यांच्याकडे रीतसर भरलेले गणना अर्ज (परिशिष्ट-अ) सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. या मतदारांचे अंशतः भरलेले गणना अर्ज ECINET मधील मतदार नोंदणी अधिकारी (ERO) डॅशबोर्डवर पुन्हा तयार करण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) अशा मतदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करतील. संपर्क तपशील उपलब्ध असल्यास प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअॅप, ई-मेल आणि एसएमएस यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे गणना अर्ज पोहोचविण्यात येतील. मतदारांना त्यांचा पूर्वीचा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) वापरून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ECINET अॅपद्वारे गणना अर्ज डाउनलोड करता येईल अथवा भरता येईल.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विविध राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या (BLA) समन्वयाने अशा मतदारांशी संपर्क साधतील. यासाठी घरोघरी भेटी देणे, शेजारी, कुटुंबातील सदस्य आणि निवासी कल्याण संघटना (RWA) यांच्याकडे चौकशी करणे तसेच उपलब्ध संपर्क क्रमांकांचा वापर करणे अशा पद्धतींचा अवलंब करण्यात येईल. मतदारांना गणना अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध पर्यायांबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

ज्या मतदारांनी आपले निवासस्थान बदललेले नाही, असे मतदार रीतसर भरलेला व स्वाक्षरी केलेला गणना अर्ज, त्यासोबत परिशिष्ट-ब मधील निवेदन आणि यापूर्वी गणना अर्ज सादर न करू शकण्याचे कारण नमूद करून संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (ERO/AERO/BLO) यांच्याकडे प्रत्यक्ष सादर करू शकतात. हा अर्ज मतदार स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यामार्फतही सादर करता येईल. अशा मतदारांसाठी ई-स्वाक्षरीसह (e-sign) ECINET वर ऑनलाइन गणना अर्ज सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ज्या मतदारांनी राज्यांतर्गत आपले निवासस्थान बदलले आहे, अशा मतदारांना नमुना-८ (Form-8) सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी गणना अर्जासोबत परिशिष्ट-क मधील निवेदन सादर करावे. या निवेदनात नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. रीतसर स्वाक्षरी केलेला गणना अर्ज, निवेदन आणि पत्त्याच्या पुराव्यासह अर्जदाराने किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याने स्थलांतरित झालेल्या विधानसभा मतदारसंघातील संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचीही मदत घेता येईल.

मतदारांना संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ECINET अॅपवर उपलब्ध असलेल्या ‘Book a call with BLO’ या सुविधेचा वापर करता येईल. ज्या बेघर व्यक्तींकडे निवासस्थानाच्या पुराव्यासाठी कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाहीत, अशा प्रकरणांत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा क्षेत्रीय पडताळणी अहवाल निवासस्थानाच्या पुराव्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

मतदारांकडून परत प्राप्त झालेले सर्व गणना अर्ज आणि त्यासोबतची विहित निवेदने मतदार नोंदणी नियम, 1960 मधील नियम 21(1) नुसार संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून निकाली काढण्यात येतील. यामध्ये अर्जदाराची पात्रता, सामान्य निवासस्थान आणि इतर संबंधित तपशीलांची पडताळणी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार क्षेत्रीय पडताळणीही केली जाईल. स्वीकारलेले गणना अर्ज चालू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विहित प्रक्रियेनुसार स्वतंत्रपणे जतन केले जातील. अशा मतदारांना विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी देण्यात आलेलाच मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) पुन्हा देण्यात येईल.

दरम्यान, ज्या मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान नवीन मतदार नोंदणीसाठी यापूर्वीच नमुना-6 (Form-6) सादर केला आहे, अशा मतदारांना निवेदनासह गणना अर्ज पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही, असेही कळविण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड