मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी लाभ घ्यावा
रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका): राज्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये शाश्वत विकासाद्वारे निलक्रांती घडविण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना" अंतर्गत 6 राज्यस्तरीय व 19 जिल्हास्तरीय योजनांना तसेच सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या 3 जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून कृषी व पदुम विभागाच्या दि.09 मार्च 2026 च्या शासन निर्णयान्वये 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील होतकरू लाभार्थी आणि मच्छिमार बांधवांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग जे.एस. पटेल यांनी केले आहे.
महाराष्ट्राने 2047 पर्यंत "विकसित महाराष्ट्र-विकसित भारतासाठी" हे ध्येय निश्चित केले असून या योजनांच्या आधारे विकसित महाराष्ट्र 2047 चे उद्दिष्ट साध्य होण्यास प्रोत्साहन मिळेल व मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास सहाय्य होईल.
"मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना" ही सर्वसमावेशक योजना असून यामध्ये संस्थेकडे मासेमारीकरीता ठेक्याने असलेल्या मामा/जि.प./ पाटबंधारे तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे व पुनर्जीवन करणे, नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम व निविष्ठा अनुदान, मत्स्य संवर्धन अस्तित्वातील तळ्यास/तलावात पॉलीथीकरण अस्तरीकरण, तयार जाळी व बिगर यांत्रिक नौकांवर अनुदान, मच्छिमार महीलांकरिता हॅण्ड ग्लोज व गमबुट उपलब्ध करुन देणे, फिरते मासे विक्री केंद्र (ई-रिक्षा विथ डिप फ्रिजर), शितपेटी (सोलर रेफ्रिजेरेटर) ई-बाईकसह खरेदीसाठी अनुदान, बिगर यांत्रिक नौकांचे यांत्रिकीकरण, पारंपारीक नौकांकरीता जीवरक्षक उपकरणांवर अनुदान, किरकोळ मासळी विक्रेत्यांना साहित्य खरेदीवर अनुदान, मासे सुकविण्यासाठी सौर सयंत्र खरेदीवर अनुदान, मच्छीमार सहकारी संस्थांचा विकास, नवीन बर्फ कारखना उभारणे / बर्फ कारखान्याचे आधुनिकीकरण या सारख्या लोकांभिमुख योजनांचा समावेश आहे.
मा.मुख्यमंत्री महोदयांनी दि.28 ऑक्टोबर 2026 रोजीपासून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेकरीता महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज स्विकारण्याकरीता शुभारंभ केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर आधारकार्ड क्रमांक व आधार जोडणी असलेल्या मोबाईल क्रमांकाचा तपशिल वापरून नोंदणी करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येईल. या योजनेंतर्गत अर्ज नोंदविणे, प्रकल्प अहवाल, प्रस्तावासाठी लागणारे कागदपत्रे व इतर आवश्यक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग, अलिबाग कोळीवाडा, बंदर रोड, कस्टम हाउस जवळ, अलिबाग या कार्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सहाय्यता कक्षाचे प्रमुख मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रायगड-अलिबाग महेश खरात, (संपर्क क्रमांक7758969112) आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (निपास), अक्षय सोनावणे, (संपर्क क्रमांक 9421627966) हे राहणार आहेत.
0000000
Comments
Post a Comment