भारतीय संविधान -आमचा अभिमान

दिनांक :- 25 नोव्हेंबर 2016                                                    लेख क्र.58

भारतीय संविधान -आमचा अभिमान


            जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगालाही मोठी देणगी दिली आहे. आपले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झाले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. या घटनेला जवळपास 67 वर्षे पुर्ण होत आहेत.
           आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे उद्गाते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, विचारवंत, तत्वज्ञ, दलितांचे कैवारी, एक चाकोरीबाह्य असे उत्तुंग व्यक्तीमत्व अशी कितीतरी विशेषणे ज्यांना लावली तरी ती कमीच पडतील असे आपले डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या देशाचे, अनमोल रत्न होय.      त्यांनी लिहिलेले आपले भारतीय संविधान हा आम्हा, प्रत्येकाचा आहे अभिमान….
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नेहरु युवा  केंद्र अलिबाग यांनी आयोजित एका कार्यक्रमामध्ये  आपले संविधान पूर्णपणे पाठांतर असलेल्या एका मुलीचा सत्कार करण्यात आला.    या मुलीस संविधानातील कोणत्याही कलमाबाबत विचारले असता काही क्षणात ती त्याचे उत्तर देत होती.    हा एक अदभूत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवयास मिळाला.  एक दिव्य अशी प्रेरणा त्या मुलीस लाभली होती.  केवळ संविधानच नव्हे तर डॉ.आंबेडकर प्रत्येक शब्द हा एक विचार असून  हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरीता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर झोपलेल्या समाजाला जागृत करुन त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम आहे असा अनुभव आला. 
त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करताना त्या प्रखर विचाराचे तेज उमगले.  26 फेब्रुवारी 1938 रोजी मनमाड येथे मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषदेत केलेले तरुणांसाठीचे भाषण म्हणजे तेजस्वी विचारधारा होय. आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर तरुणांना सांगतात की, तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेविले पाहिजे.  तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते.  म्हणूनच आपल्याकडे एक म्हण रुढ आहे, की "तपाअंती फळ" कार्य  आत्मोन्नतीचे असो की, राष्ट्रोन्नतीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. "प्रयत्न,तप यातून आपले ध्येय सहज साध्य होईल असा महत्वपूर्ण विचार ते सांगतात.       स्वत: विद्यार्थी दशेत केलेल्या कष्टाचा दाखला देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, बुध्दीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे. 24 तासांपैकी 20 तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे.  मी माझ्या विद्यार्थीदशेत  येथे व परदेशातही सतत 20 तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुध्दीचा प्रभाव वाढवायचा आहे त्यांनी तप केले पाहिजे,श्रम केले पाहिजेत.  यावरुन हे स्पष्टपणे सिध्द होते की,  आळस हा तरुणांच्या, युवकांच्या ठायी नसलाच पाहिजे त्याखेरीज कोणतेही ध्येय प्राप्त होऊ शकत नाही.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करताना 'बोल महामानवाचे' हा डॉ.नरेंद्र जाधव अनुवादीत व संपादित ग्रंथाचे अवलोकन केले. त्याद्वारे भारतरत्न डॉ.आंबेडकरांच्या काही विचारांचा, तत्वांचा सहज व सुलभ अर्थ लक्षात येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पाचशे मर्मभेदी भाषणे, आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन (खंड एक) असलेल्या या ग्रंथरुपी विचार प्रवाहात अत्यंत महत्वाचे असे  विचार मांडलेले आहेत. यातील तरुणांसाठीचे केलेले भाष्य अत्यंत उद्बोधक, प्रेरणादायी असे आहे 
पुस्तकांचा प्रिय सहवास
            तर ग्रंथाबद्दल, पुस्तकांबद्दल आपले विचार मांडतांना पुस्तकांचा सहवास किती प्रिय आहे हे देखील सहज आणि सोप्या शब्दात त्यांनी विलायतेहून पाठविलेल्या पत्रात मांडले आहेत. ते म्हणतात, "स्नेही किंवा सोबती जोडण्याची कला माझ्या ठायी नाही.  माझी मुद्रा अतिशय कडक व उग्र दिसते व त्यामुळे मजजवळ येण्यास लोक वचकतात असे म्हणतात.  असे असणे  काहीच अशक्य नाही पण माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो ही गोष्ट मात्र खरी आहे." त्यांच्या लेखी विद्येला प्रचंड महत्व असून ते विद्येला पहिले दैवत मानतात. ज्या ज्योतिबांनी विद्येचे महत्व अधोरेखित केले आहे त्या महात्मा ज्योतिबांनाही ते आपले गुरू मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेले तीन गुरू व तीन उपास्य देवतांबद्दल सांगितले आहे की, "माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य देवतांनी घडले आहे.  माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरुबुध्द होते माझे दुसरे गुरु कबीर आणि माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतीबा फुले होत..  माझी तीन उपास्य दैवतही आहेत.  पहिले दैवत विद्या,दुसरे दैवत स्वाभिमान आणि तिसरे दैवत म्हणजे शील होय"  बुध्द, कबीर अणि महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरूस्थानी ठेवून विद्या, स्वाभिमान आणि शील या देवतांची उपासना करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महामानवच होते.
            उच्च शिक्षणाने डॉ.आंबेडकर एक बुध्दीमान आणि सामर्थ्यशाली पुरुष झाले.  तीन विश्वविद्यालयात त्यांनी ज्ञान संपादनासाठी तपश्चर्या केली.  अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, निर्बंधशास्त्र, इतिहास यांचा संसार त्यांनी पाठीशी बांधला होता.  पंडितांना,राजकारणी धुरंधरांना नि अर्थशास्त्रज्ञांना आवाहन देणाऱ्या  पांडित्यांचे पाशुपत अस्त्र अर्जुनाप्रमाणे घोर तपश्चर्याच्या जोरावर संपादन करुन  ते पुढील संग्रामास सिध्द झाले.  अशा शब्दांमध्ये भारतरत्न्‍ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे  वर्णन  धनंजय कीर यांनी आपल्या लिहिलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र ग्रंथात केले आहे.  अगदी उपरोक्त वर्णनाप्रमाणेच भारतरत्न्‍ आंबेडकरांची कारर्किर्द प्रखर व तेजस्वी राहिली.    
केवळ संविधानच नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक क्षेत्रातील विचारही तेजस्वी, प्रखर व मौलिक असे आहेत. आधुनिक भारताच्या संदर्भात सामाजिक क्रांतीचा विचार मांडून त्या दृष्टीने त्या दिशेने कृती करणारे तत्वज्ञ व राजकीय नेते म्हणून डॉ.आंबेडकरांचे स्थान निर्विवादच आहे.ज्यांच्या विचारांचा संपूर्ण जगाने सन्मान केला, आदर केला अशा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या  महातत्वज्ञाच्या विचारांच्या विशाल वटवृक्षांचे हे एक पर्ण. आज आपली लोकशाही जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही समजली जाते. तिच्या या श्रेष्ठत्वासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अपार कष्टही महत्वाचे आहे. भारतीय संविधान दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
                       
 संदर्भ :-  1) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेतून आलेली पत्रे- रघुवंशी प्रकाशन पुणे.
            2) बोल महामानवाचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 500 मर्मभेदी भाषणे- डॉ.नरेंद्र जाधव-ग्रंथाली    
                प्रकाशन मुंबई.
            3) लोकराज्य ऑक्टोंबर-2006.व एप्रिल 2016
                4) 'यांनी घडवल सहस्त्रक'-रोहन प्रकाशन पुणे.
संकलन-डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक