माणगावच्या नारी शक्तींचा महामेळावा महिला सक्षमीकरणाचा

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक 20 ऑगस्ट 2016                                                                 लेख क्र.21
माणगावच्या नारी शक्तींचा
महामेळावा महिला सक्षमीकरणाचा
   रायगड जिल्हा प्रशासनामध्ये महिलांची मोठी आघाडी आहे. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले या प्रशासन प्रमुख म्हणून सक्षमतेने कार्यभार सांभाळत आहेत.  तर उपविभागीय अधिकारी (प्रांत), उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी अशा महत्वाच्या पदावर काही महिला अधिकारी समर्थपणे कार्यरत आहेत.
 त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे माणगावच्या तहसिदार उर्मिला पाटील एक धडाडीच्या अधिकारी.   अगदी वाळू माफीयांच्या विरोधात प्रत्यक्ष नदीवर वाळू उपसा केंद्रावर  धाड टाकण्याची धाडसी वृत्ती.    महसूल सप्ताहानिमित्त माणगावात त्यांनी नारी शक्तीचा महामेळावा आयोजित करुन आपल्या  उत्तम कार्याची साक्ष दिली.  या मेळाव्यात माणगाव पंचक्रोशीतील महिलांची मोठी गर्दी होती.  महिला सक्षमीकरणाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असा आहे.



शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी 1 ते 7 ऑगस्ट 2016 या कालावधीत महसूल आठवडा हे राज्यव्यापी अभियान राबविण्यात आले.   या अभियानात रायगड जिल्ह्यानेही   सर्वत्र महसूल विभागाचे उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा केला. असाच एक मेळावा 11 ऑगस्ट 2016 रोजी माणगाव येथे संपन्न झाला.  या मेळाव्यात प्रामुख्याने महिलांचे मनोधैर्य वाढविणे, महिलांविषयी असलेल्या योजनांची माहिती देणे, त्यांना सक्षम होण्यासाठी अवगत करणे या बाबींवर भर देण्यात आला. 
समाजात आदराचे स्थान मिळविण्यासाठी प्रथम महिलांनी महिलांचा आदर करावा.  महिलांच्या विकास व उन्नतीकरिता शासन कटिबध्द असून प्रशासनाकडून यासाठी सर्वतोपरी सहकार्य आहे अशी ग्वाही मेळाव्यास उपस्थित माता-भगिनींना देऊन संयोजिका उर्मिला पाटील यांनी सदर मेळाव्यात देण्यात येणाऱ्या माहितीचा, योजनांचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन केले.  
7/12 नावाचा उतारा
कोणत्याही महत्वाच्या शासकीय दस्ताऐवजावर नाव असणे ही महत्वाची व प्रतिष्ठेची बाब समजली जाते. आपल्या ग्रामीण भागात प्रामुख्याने 7/12 चा उतारा हा एक महत्वाचा महसूल दस्तऐवज समजला जातो. त्यामुळे लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत या 7/12  उताऱ्यावर पुरुषांच्या बरोबर महिलांना सहहिस्सेदार म्हणून नोंद घेण्याचे काम या मेळाव्यात करण्यात आले.  तसेच संजय गांधी योजना, रोजगार हमी योजना, पुरवठा विषयक योजना या सदंर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. 
तसेच या मेळाव्यात महसूल प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्याना देण्यात आली.   विविध प्रकारचे दाखले, शिधापत्रिका, धनादेशाचे वितरण, पंतप्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडण्यासाठीचे अर्ज तसेच नविन महिला मतदारांचे अर्ज, आधार नोंदणी, संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थीचे अर्ज आदि योजनांची माहिती देऊन संबधितांकडून ते अर्ज भरुन घेतले गेले.  
  

मान्यवरांचे मार्गदर्शन
माणगावचे प्रांत. तथा मेळाव्याचे अध्यक्ष विश्वनाथ वेटकोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करुन उपस्थितीतांना महिला सक्षमीकरणाबाबत अवगत केले.   करंबेळीच्या सरपंच श्रीमती कुर्मे, माजी पं.स.सभापती श्रीमती बक्कम यांनीही आपले विचार मांडताना महिलांनी सक्षम होण्यासाठी आवाहन केले.   तसेच  महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात डॉ.शिंदे मॅडम यांनी स्त्री आरोग्यविषयक माहिती दिली.   गटविकास अधिकारी श्री.रेवंडकर, मंडळ कृषी अधिकारी श्री.जायभाये, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुखदेवी, आय.डी.बी.आय.चे बँक मॅनेजर श्री.सावंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परदेशी यांनी देखील त्यांच्या खात्याशी निगडीत असलेल्या महिलांच्या योजनेबाबत मार्गदर्शन केले.
  मेळाव्याच्या सुरुवातीला  महाड जवळील सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.    सदर मेळाव्यास महसूल नायब तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटी, निवासी नायब तहसिलदार अमोल पोवार, पुरवठा निरीक्षक सुरेश वाढवळ, निवडणूक नायब तहसिलदार  सुरेश खोपकर यांचेसह तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी  यांचे विशेष सहकार्य होते.
एकूणच महिला सक्षमीकरण हा एक महत्वाचा भाग असून ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या तर आपल्या लोकशाहीचा एक महत्वाचा भाग अधिक कणखर होऊ शकतो. आपल्या देशाचा इतिहास पाहता महिलांनी केलेले विविध क्षेत्रातील कार्य हे अधोरेखित आहे.  अगदी कालचे उदाहरण म्हणजे रिओ ऑलिपिंक मधील आपणास मिळालेल्या रौप्य व कास्य पदकाच्या मानकरी सिंधू व साक्षी या दोन्हीही महिला आहेत हे गौरवाने नमूद करावे लागेल. 
0000000

डॉ.राजू पाटोदकर
                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
Patodkar@yahoo.co.in



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक