पंचायत समिती म्हणजे ग्रामविकासासाठी महत्वाचे प्रवेशद्वार ---ग्रामविकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे खालापूर पंचायत समिती नुतन इमारत लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 30 जुलै 2016                                                                   वृत्त क्र.459
पंचायत समिती म्हणजे
ग्रामविकासासाठी महत्वाचे प्रवेशद्वार
                                                    ---ग्रामविकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
खालापूर पंचायत समिती नुतन इमारत लोकार्पण सोहळा संपन्न
                                                                       
अलिबाग दि. 30:-  पंचायत समिती म्हणजे ग्रामविकासासाठी असलेले महत्वाचे प्रवेशद्वार आहे.  त्यामुळे ही इमारत सुसज्ज असलेलीच पाहिजे, त्याशिवाय सर्व सामान्यांसाठी सेवा व समाधान देणारी असावी, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी खालापूर  येथे केले.


 खालापूर येथील पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.  यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री सुरेश लाड, प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती उमा मुंढे, खालापूर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती मालतीताई खांडेकर, उपसभापती श्यामसुंदर साळवी, सदस्य निवृत्ती पिंगळे, गजानन मांडे, दत्तात्रेय पुरी, लता पवार, वत्सला मोरे, दिप्ती म्हात्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, कर्जत प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, खालापूर तहसिलदार राजेंद्र चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री महोदया म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक पंचायत समितीची इमारत ही सुसज्ज व तत्पर सेवा देणारी असली पाहिजे.  कारण राज्यातील गोरगरीबांसाठी ही इमारत महत्वपूर्ण असे कार्य करणारी आहे.  कामासाठी येथे येणाऱ्या प्रत्येकाचे काम होऊन त्यास समाधान  मिळाले पाहिजे. त्यासाठीच आपले शासन कार्य करीत आहे. पंचायत समितीची ही नतुन वास्तू अत्यंत देखणी असून या लोकार्पण सोहळयास उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाल्या बद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले. ग्राम विकासात शासन महत्वपूर्ण असे  कार्य करीत असून लोकाभिमुख उपक्रम, योजना या विभागामार्फत सुरु आहेत. यात प्रामुख्याने विकासासाठी उपयुक्त असलेली आमचे गाव-आमचा विकास ही योजना आहे. ग्राम विकासास चालना दिली तर खरा विकास होईल. त्यासाठी याकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. ग्रामीण भाग स्वंयपूर्ण होणे आवश्यक आहे  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अंगणवाडी ताईंच्या थकित मानधनाचा प्रश्न आता लवकरच सुटेल असा विश्वास देऊन राज्यातील अंगणवाडया स्मार्ट अंगणवाडया होऊन स्वत:च्या इमारतीमध्ये जातील. सोलर विजेची यंत्रणा तसेच जगातील ज्ञान त्यांना सहज मिळावे यासाठी टी.व्ही. आदि व्यवस्था अंगणवाडीत असेल. असेही त्या म्हणाल्या.
वरद विनायकाकडे मागणे
या कार्यक्रमात येण्यापूर्वी मंत्री महोदयांनी महडच्या वरद विनायकाचे दर्शन घेतले. त्याचा दाखला देत त्या म्हणाल्या की, राज्यातील प्रत्येक विभाग हा कोकणासारखा निसर्गाने संपन्न व सुरेख कर अशी प्रार्थना मी वरद विनायकाकडे केली आहे. कोकणातील हिरवळ व खळखळणारे  पाणी पाहून मनास आनंद वाटतो. कोकणवासीयांच्या माझ्या विभागाकडील काही मागण्या असतील तर त्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तर आपल्या भाषणातून खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, पंचायत समिती हे तालुक्याचे प्रमुख कार्यालय असते. त्यामुळे खालापूर येथे उभारलेली ही पंचायत समितीची इमारत तालुक्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे. येथे येणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काम तात्काळ व्हावे, तक्रारीस वाव असू नये असे अधिकारी व कर्मचारी यांनी वागावे, तरच हे कार्यालय सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटेल. तसेच त्यांनी इमारतीच्या पूर्णतेबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
आमदार सुरेश लाड यांनी या कार्यालयाकडून आता जास्तीत जास्त लोकाभिमुख कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या नुतन इमारतीला फर्निचर, संगणक आदि अद्ययावत यंत्रणा मिळावी, अशी मंत्री महोदयांना विनंती केली. तसेच अंगणवाडी ताईंचे प्रश्न मार्गी निघावेत असेही ते म्हणाले. तर आमदार मनोहर भोईर यांनी या नुतन वास्तूचा खालापूरकरांना निश्चित आनंद वाटतो असे सांगून, या इमारतीद्वारे प्रत्येकाला न्याय मिळेल अशी भावना ठेवा, असे आवाहन केले. तसेच मंत्री महोदयानी रायगड जिल्हयाला झुकते माप द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पंचायत समिती सभापती सौ.मालतीताई खांडेकर यांनी या इमारतीमुळे स्वप्नपूर्ती झाल्याचे सांगून उपस्थितांचे स्वागत केले.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी नुतन इमारतीचे उद्घाटन करुन मंत्री महोदयांनी व उपस्थितांनी दीप प्रज्वलन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आपल्या प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी खालापूर तसेच रायगड जिल्हयाच्या संस्कृतीची माहिती देत सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने प्रसंगी मनोवृत्तीत बदल करुन उत्तम प्रतीचे कामकाज देण्याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही मंत्री महोदयांना दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. या कार्यक्रमास खालापूर परिसरातील नागरीक, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपरिषदेचे आजी माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी, मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक