पेणच्या सुरेख मंगलमूर्ती गाऊ तयांची आरती

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक  01 सप्टेंबर 2016                                                                 लेख : 28
पेणच्या सुरेख मंगलमूर्ती
गाऊ तयांची आरती







अष्टविनायकातील महड व पाली हे दोन गणेशस्थान असलेला रायगड जिल्हा.  आणि या गणेशस्थानासोबतच गणेशमूर्तीसाठी जगभर प्रसिध्द असलेले पेण हे गाव.  केवळ पेण हे गाव नव्हे तर पेणच्या आसपास असलेले बरीचशी गावे गणेशाच्या सुरेख मूर्ती तयार करण्यात वर्षभर मग्न असतात.  अगदी संपूर्ण वर्षभर गणेश मूर्ती तसेच देवीच्या मूर्ती निर्मिती प्रक्रियेत असलेला पेण परिसरातील हा महत्वाचा उद्योग व्यवसाय.
            अगदी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यासोबत गुजरात,राजस्थान,तेलंगणा,आंध्र, गोवा राज्यात आणि परदेशातही पेणच्या गणेशमूर्तीची मागणी आहे.   या भागात गणेशोत्सवाच्या काळात 20 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेची आर्थिक उलाढाल होते. अशा या गणेशाची, पेणच्या मंगलमूर्तीची आणि तेथील व्यवसायाची ही माहिती.

गणपती मूर्ती तयार करणे आणि गणेशोत्सवात त्याची विक्री करणे असे वर्षभर करुन जवळपास लाखभर लोकांची उपजिवीका चालवणारा हा व्यवसाय पेण,हमरापूर, जोहे,कळवा,दादर आणि काही भागात सुरु आहे.  अगदी जुन्याकाळचा संदर्भ घेतला तर पेशवेकालापासून किंबहुना त्याआधी ही पेणच्या गणपतीची महती सांगितली जाते.  तेव्हापासून तयार होत असलेल्या या गणेश कारखान्यांनी आता पेणला गणपतीची हब केलेले आहे.  या परिसरातील प्रत्येक घराघरात जुनी-नवी पिढी, गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामी गुंतलेली आपणास दिसते. घरात,अंगणात,दारात, गावात,मैदानावर वा कोणत्याही मोकळया जागेत जिकडे पाहावे तिकडे शेकडो,हजारो अगदी लाखो श्रीगणेशाच्या वेगवेगळया आकारातील व उंचीच्या गणेशमूर्ती आपणास पहावयास मिळतात.  अगदी गणपतीच्या गावात आलो आहोत असेच वाटते.
भावनिकता
गणेशमूर्तीतील सुरेख रंग, सुबकता, नाजूक कलाकुसर, पहाताना असे वाटते की, जणू काही प्रत्यक्ष श्रीगणेशाने येथील कलाकारांना स्वत:ची मूर्ती बनविण्याची कला मुक्त हस्ताने देऊन या भागाचे महत्व वाढविले आहे. असे आगळेवेगळे वैशिष्ट्य येथील गणेशमूर्तीत आहे. या संदर्भात गेली चार पिढया गणेशमूर्ती व्यवसाय करणाऱ्या देवधर कुटुंबातील श्रीकांत वामनराव देवधर यांनी बोलतांना सांगितले की,स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत पेण येथे हा व्यवसाय वेगवेगळया कुटुंबात पारंपारिकरित्या चालत होता.  मात्र 1950 ते 1980 या 30 वर्षात हळूहळू त्याचे रुपांतर कारखान्यात झाले आणि 1980 नंतर या कारखान्याचे हब मध्ये रुपांतर होऊ लागले.  2000 साली श्रीगणेशमूर्तीकार व्यवसायिक मंडळ तयार झाले.  शासनाच्या विविध योजना मिळविण्यासाठी प्रयत्न झाले ते अजूनही सुरु आहेत.  पेणच्या गणपतीशी लोकांचे भावनिक नाते आहे.  बऱ्याच कुटुंबाकडे कित्येक वर्षांपासून एक सारखीच गणेशमूर्ती असते.  त्यांच्यासाठी ती आम्हाला तयार करावी लागते.  महाराष्ट्रातील आणि देशातील बऱ्याच उद्योगपतींकडे पेणची ठराविक मूर्तीच आपणास प्रतिवर्षी दिसून येते.  त्यामुळे भावनांचा अविष्कार असलेल्या या मूर्ती आहेत.  याखेरीज प्रचलित,लोकप्रियतेनुसार देखील मूर्ती काहीजण तयार करतात.  गतवर्षी खंडोबाचे प्रतिक असलेली मूर्ती तर यावर्षी बाजीरावची मूर्ती काही ठिकाणी बनली आहे.  त्याचीही विक्री चांगली हेातेच.  पण मूळ पेणच्या मूर्तींना मोठी मागणी आहे.   लहान मोठया संख्येने सातशे पेक्षा अधिक कारखाने या भागात आहेत. 
सुरेख आखणी
पेणच्या गणपती बाप्पाच्या सुरेख असण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे येथील कारागीर मंडळी. नाजूक कलाकुसर, रंगरंगोटी आणि डोळे काम अत्यंत सुबकतेने करतात त्यास आखणी असे म्हणतात. या कामासाठी पेणच्या कारागीरांना तोड नाही. आखणीची ही कला पिढीजात आलेली आहे तर काही ठिकाणी नवोदितांनाही ती शिकविण्यात आली. अगदी पेण परिसरातील महिला मंडळी देखील हे कलाकुसरीचे काम सहजतेने करताना येथे दिसतात.
विसर्जनाला मुहूर्त
शाडुच्या मूर्ती बनविण्यासाठी जुने जाणते कारागीर मिळत नाहीत. शिवाय ती महाग पडते.  ही महत्वाची अडचण आहेच. तरी देखील गेल्या 25ते 30 वर्षापासून केवळ मातीच्या व शाडूच्या मूती बनविण्याचे काम अष्टविनायक कला केंद्राचे सदाशिव पवार व त्यांचे कुटुंबिय करत आहेत.  विसर्जनाच्या दिवशी विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीची माती अथवा  शाडू घेऊन पुढील वर्षाचा मुहूर्त पवार यांचेकडे केला जातो.   या क्षेत्रात 40 वर्षापासून पवार कार्यरत आहेत तर जवळपास 25 ते 30 कुटुंबाना वर्षभर रोजगार या कारखान्यातून दिला जातो.  एमबीए झालेला सागर,  एमए असलेला सचिन, पदवीधर सुनिल ही तीनही  मुले या व्यवसायात त्यांना साथ देत आहेत.  त्यांच्याकडे रामचंद्र भोईर नावाचे जुने मूर्तीकार हे श्रीगणेशाची विविध रुपे लिलया बनवून देतात.   जवळपास तीस हजार मूर्ती त्यांच्या कारखान्यामार्फत बनतात. 
पेण परिसरात अगदी 4 इंच ते 12 फुट उंचीच्या मूर्ती तयार होतात. यापेक्षाही अधिक उंच मूर्तीही तयार केल्या जाऊ शकतात, पण वाहतूकीचा प्रश्न मोठा असल्याने ते टाळले जाते. केरळचा काथ्या, गुजरातचे पी.ओ.पी. आणि महाराष्ट्राची कलाकुसर असे एकत्र मिश्रण होऊन पेण परिसरातील गणपती बाप्पांची मूर्ती तयार होते आणि मग भक्तांच्या घरी तसेच जगाचा प्रवास करते.  म्हणूनच म्हणावेसे वाटते पेणच्या सुरेख मंगलमूर्ती गाऊ तयांची आरती…
परदेशी महत्व
श्रीगणेशमूर्तीचे हब असलेले पेण अधिकाधिक माध्यमातून लोकप्रिय व्हावे अशी येथील सर्वांचीच इच्छा. विशेषत: देवधर बंधू त्यात अग्रेसर. श्रीकांत देवधर यांना तर गणेशमूर्ती बाबत व्याख्याने तसेच मूर्ती बनविण्याचे प्रात्याक्षिक दाखवणे यासाठी परदेशातून बोलावणे सुरुच असते. स्विर्झरलँड, युरोप,जर्मन,येथे ते जातात आणि तेथील मंडळींना श्रीगणेशाचे महत्व समजून सांगतात.  कधी कधी त्यांना आपला गणपती गॉड हा माऊस वरच का? मर्सिडिजमध्ये का नाही अशा प्रश्नांनाही उत्तरे द्यावी लागतात.  त्यावेळी मातीतून आलेलाच हा देव विर्सजनानंतर परत मातीत मिसळतो.  ही संकल्पना सांगून गणपती बाप्पा हा असा देव आहे ज्यास आपण घरी बोलवतो आणि पुजा करतो अशी माहितीही ते देतात.  पेणचे गणपती हा मोठा युएसपी (युनिट सेलींग प्राईज)असताना त्याचा फारसा उपयोग करु शकत नाही ही त्यांची खंत आहे.  पेणला गणपतीचे मोठे माहितीकेंद्र असावे ही त्यांची इच्छा.  तसेच गणेशमूर्ती या व्यवसायासाठी उद्योग म्हणून पाहत असताना कंपन्यांचे नियम न लावता आर्ट अँण्ड क्रॉप्टसाठीचे काही वेगळे निकष लावावते असे त्यांना वाटते.
एकूणच येथील कारागीरांना बारमाही काम असल्याने कुटूंबाची रोजीरोटी सुरु असते.  गणपती झाले की गौरी, नवरात्रीसाठी देवी आणि दिवाळीचे मावळे अशी वर्षभर कामाची रेलचेल. अशा प्रकारे येथे जुन्या जाणत्या कारागीरांच्या मार्गदर्शनात नविन कारागीर अहोरात्र काम करतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला सहजतेने हस्तांतरीत होते व त्यायोगे एका अभिजात कलेचा वारसा पुढे जोपासला जातो.
0000

डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक