भात पीकावरील किड रोग व्यवस्थापन

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 1 सप्टेंबर 2016                                                         लेख क्रमांक 27
भात पीकावरील किड रोग व्यवस्थापन

भात पिकावरील पडणाऱ्या किड, रोग  यांचे  योग्य नियोजन केले तर भात पिकाचे संरक्षण होऊन प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता वाढते.  भात पिकावरील किड रोगाचे व्यवस्थापन,वापरण्यात येणारी किटकनाशके त्यांचे प्रमाण, वापरण्याची  पध्दती, मैत्र किटकाचे संवर्धन याबाबत माहिती देणारा लेख

          बहुसंख्य लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. भाताची प्रतिहेक्टरी उत्पादकता फारच कमी आहे.  ती वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, रासायनिक, जैविक सेंद्रिय खतांचा योग्य वापरण्याबरोबरच किडी व रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणाची एकात्मिक उपाययोजना करणे आवश्यक आहे.  किड रोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्पअंतर्गत  किड रोगांचे सर्व्हेक्षण सुरु आहे.  किड रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास तसेच सल्ला पत्रके ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाणार आहेत.  शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.  भातपिकांवर खालापूर, पनवेल,कर्जत व उरण या तालुक्यात साधारणत: खोडकिडा, पाने गुंडाळनारी अळी, तुडतुडे, खेकडे, सुरळीतील अळी या किडी आढळून येतात.  त्यांचे नियंत्रण करण्यासाठी काही मुलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.  
खोडकिडा :-  किडींचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर मधला गाभा वरुन खाली सुकत येतो याला गाभा जळणे असे म्हणतात.  किड जर पीक पोटरीवर आल्यानंतर पडली तर दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या बाहेर पडतात त्याला पळीज किंवा पांढरी पीशी म्हणतात.  लावणीनंतर शेतात 5 टक्के किडग्रस्त फूटवे आढळल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंजऱ्यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्याक्रमाने आढळल्यास खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.  वेळोवेळी किडग्रस्त फुटवे अथवा पळीज काढून टाकावेत.
              किटकनाशकांचा वापर : शेतात कडुनिंबयुक्त किटकनाशके वापरावीत.  दाणेदार 10 टक्के फोरेट 4 किलो किंवा 5 टक्के क्विनॉलफॉस 6 किलो किंवा 3 टक्के कार्बोफ्युरा 6.6 किलो प्रती एकरी टाकावे.  25 टक्के प्रवाही क्विनॉलफॉस 640 मिली किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के 240 ग्रॅम किंवा ट्रायफॉस 40 टक्के 540 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रती एकरी फवारावे.  वरील औषधे फुलोरा अवस्थेपर्यंत वापरता येतात. 
       तुडतुडे : ही किड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि जेथे नत्र खतांच्या मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिल्या जातात त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येते.  मादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात.  परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते.  विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुडयांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते.  अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत.  जरी पडल्याच तर दाने पोचट होतात.  नत्र खतांच्या मात्रा वाजवी प्रमाणात द्याव्यात.  किड नियंत्रणासाठी किड प्रादुर्भावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.  जर एका बुंध्यावर 5 ते 10 तुडतुडे असतील तर किटकनाशकांचा वापर करावा.  फवारणीसाठी 200 लिटर पाण्यातून ऍ़सिफेट 76 टक्के 264 ग्रॅम किंवा कार्बारील 50 टक्के 800 ग्रॅम डायकलोरोव्हास 76 टक्के 188 मिली किंवा फिप्रोनिल 5 टक्के 400 मिली किंवा इमिडाक्लोरोप्रिड 17.8 टक्के 40 मिली प्रति एकरी फवारावे.  किटकनाशकाचा फवारा बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.
          निळेभुंगेरे : भुंगेरे गर्द निळयारंगाचे असून अळी भुरकट रंगाची असते. या किडीची अळी व्यवस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत.  ही किड पानाचा हिरवाभाग कुरतडून खाते.  शेवटी संपूर्ण पीक वाळते.या किडीच्या नियंत्रणासाठी  क्विनालफॉस 2 टक्के प्रवाही 800 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 250 मिली प्रतिएकरी 200 लिटर पाण्यातून करावी.  ही किड भातपिकानंतर बांधावरील गवतांवर उपजिवीका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रवकारक होते म्हणून बांधावरील गवतांचा भात लावणी नंतर नायनाट करावा.  या किडीचा सतत प्रादूर्भाव होत असलेल्या भागात कापणीनंतर शेताची नांगरट करुन चोथ्याचा नाश करावा म्हणजे पाणथळ जमिनीत फुटवा येणार नाही आणि किड प्रसारास प्रतिबंध होईल.  जमिनीत पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल यांची काळजी घ्यावी.
               पाने गुंडाळणारी अळी :- या अळया आपल्या लाळेने पानाच्या दोन्ही कडा लांबीच्या दिशेने एकत्र चिकटवून गुंडाळी करुन आतमध्ये लपून रहातात.  पानातील  हिरवा भाग (हरितद्रव्य) कुरतडून खातात.  त्यामुळे गुंडाळीयुक्त पानावर पांढरे चट्टे पडतात.  त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, पीक निसवण्यास व दाणे भरण्यावर परिणाम होतो.    प्रत्येक चुडात 1 ते 2 नविन किडग्रस्त पाने दिसल्यास प्रति एकरी मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 280 मिली किंवा ऍ़सिफेट 76 टक्के 200 ग्रॅम प्रवाही किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के 200 ग्रॅम किंवा क्लोरोपायराफॉस 20 टक्के 750 मिली किंवा क्विनालफॉस 25 ईसी 400 मिली 200 लिटर पाण्यात फवारावे.
           सुरळीतील अळी : अळी कोवळे पान कापून त्याची सुरळी करुन त्यात राहते पानातील हिरवा पापुद्रा खाते व बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते अशा सुरळया पानाला लटकून राहतात किंवा पाण्यावर तरंगतात.  गरज पडल्यास पाने गुंडाळणारी अळी प्रमाणे उपाययोजना करावी.
           खेकडा : खरीप हंगामात भाताचे खेकडयांपासून बरेच नुकसान होते.  खेकडे दिवसा बिळामध्ये राहतात आणि रात्री भाताची रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात.  परिणामी भाताच्या रोपांची संख्या कमी होऊन प्रति हेक्टरी उत्पादनात बरीच घट होते.  क्वचितप्रसंगी बांधालगत भाताची पुन्हा लावणी करावी लागते.  याशिवाय खेकडे भात खाचराच्या बांधास मोठया प्रमाणात छिद्रे पाडतात.  परिणामी भात खाचरात पाणी साठविणे कठीण जाते.  तसेच बांधाची वरचेवर दुरुस्ती करावी लागते.  खेकडयांच्या नियंत्रणासाठी पावसाळा सुरु झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात रोज रात्री कंदीलाच्या साहाय्याने बांधावरील खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी अमिषाचा  वापर करुन खेकडयांचे नियंत्रण  करता येते.  त्यासाठी एक किलो शिजवलेल्या भातामध्ये 75 टक्के पाण्यात मिसळणारी ऍ़सीफेट भुकटी 75 ग्रॅम आणि 20 ग्रॅम गूळ मिसळून  विषारी अमिष तयार करावे.  या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या 100 गोळया तयार कराव्यात आणि प्रत्येक बिळाच्या तोंडाशी एक गोळी ठेवावी.   रात्री खेकडे बाहेर आमिष खातील आणि त्यांचा नाश होईल.  दुसऱ्या दिवशी जी बिळे उकरली जातील अशा बिळात परत ? अमिष वापरावे.  किटकनाशके विषारी असल्याने काळजी पूर्वक वापर करावा.
भातावरील रोंगांच्या नियंत्रणासाठी पीक सरंक्षण उपाय योजना
           करपा/शेंडेकरपा (रोपावस्थते पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत) :- कॉपर ऑक्सिक्लोराइड 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॉझॉल 10 मिली किंवा आयप्रोबीन 20 मिली किंवा इडीफेनफॉस 10 मिली,10 लिटर पाण्यात फवारावे.  आवश्यकता भासल्यास 15ते 20 दिवसांच्या अंतराने 3 फवारणी केल्यास रोग नियंत्रण करता येते.    नत्र खताचा योग्य वापर करावा अतिरिक्त वापर टाळावा.
      कडाकरपा (फुटवे आणि फुलोरा) :- धसकटे गोळा करुन नष्ट करावीत.  बांधबदिस्ती आणि बांधावरील गवत व इतर तणे काढावीत.   भात खाचरात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.  नत्र खताचा योग्य वापर करावा.  पीक फुलोऱ्यात असताना रोग आढळून आल्यास द्यावयाची खताची मात्रा उशिरा द्यावी.
एकात्मिक किड नियंत्रण जैविक नियंत्रण
      शेतात पक्षी थांबे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे याद्वारे किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते.  आपल्या शेतात असलेल्या मित्र किटकांचे संवर्धन करावे.  उदा.कोळी,चतुर,नाकतोडे, ट्रायकोग्रामा  इत्यादी मित्र किटकांस हानिकारक किटकनाशक वापरु नये.  खोडकिडीचे अंडीपुंज गोळा करुन बांबूच्या टोपलीत ठेवावेत.   त्यामुळे मित्र  किटक आकर्षित होऊन अंडी घालतात.  मित्र किटकांची संख्या वाढते.  पंतगवर्गीय किडीसाठी  ट्रायकोग्रामा जापोनिकम ट्रायकोकार्ड प्रत्येक आठवडयास 50 हजार हेक्टरी  पाच-सहा वेळा सोडावेत.  
        बेडूक हा प्राणी भाताचा खोड किडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, स्कीपर, पाने खाणारी अळी इत्यादी किडींवर उपजीविका करतो.  म्हणून भात खाचरांमध्ये बेडकांचे जतन करावे.  तसेच बेडकामुळे खेकडयांपासून होणारे भाताचे नुकसानही कमी होऊ शकते.  तांत्रिक पध्दतीने नियंत्रण करताना खोड किडीचे अंडी पंुज काढून त्यांचा नायनाट करावा.  दोरीच्या सहाय्याने सुरळीतील अळया खाली पाडाव्यात.
       जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असेल किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण असेल तरच शिफारस केलेल्या किटकनाशकांचा गरजेनुसार वापर करावा.  निळे भुंगेरे, तुडतुडे, काटेरी भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव जिथे पाणी साठते अशा पाणथळ खोलगट जमिनीत मोठया प्रमाणात  होतो.  म्हणून खोलगट जमिनीत पाणी जास्त काळ न साठवता त्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी.  त्यासाठी सामुदायिक चर काढता येथील.  निळे भुंगेरे, काटेरी भुंगेर आणि ढेकण्या हे बांधावरील गवतावर उपजीविका करतात म्हणून बांध स्वच्छ ठेवावेत.  भात पीक कापणी नंतर गवताचा नायनाट करावा.  भात कापणी करताना वैभव विळयाचा वापर करावा.  किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास निश्चितच होणारे नुकसान टाळता येणे शक्यत आहे.
0000

                                                                                              पांडुरंग शिगेदार
                                                                                              उपविभागीय कृषी अधिकारी,खोपोली
                                                                                                 मार्फत: जिल्हा माहिती कार्यालय,रायगड


       



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक