बळीराजाचा बहुमान कृषी पुरस्काराचा सन्मान

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
लेख क्र.37,                                                                  दिनांक :- 22/09/2016
बळीराजाचा बहुमान
कृषी पुरस्काराचा सन्मान
           आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. महाराष्ट्रातही कृषी क्षेत्राला मोठे महत्व आहे. आपल्याकडे   राज्यातील डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ.पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ, अकोला, स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महात्मा फुले  कृषी विद्यापीठ, राहुरी या चार महत्वाच्या कृषी विद्यापीठा मार्फत संशोधन केले जाते. तसेच कृषी विभागामार्फत ही विविध प्रयोग राबविले जातात. प्रांतानुसार, तेथील वातावरणानुसार या प्रयोगांची अंमलबजावणी होते आणि त्यातूनच प्रगतीची एक दिशा मिळते.
           त्यामुळे या भागातील बळीराजाला  आपल्या शेतीत उत्पन्न वाढीचे प्रयोग करता येतात. त्यात तो यशस्वी देखील होतो. त्याच्या यशाची महती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच त्यास प्रोत्साहान देण्यासाठी कृषि विभागामार्फत वेगवेगळे कृषि पुरस्कार देण्यात येतात. त्याची ही थोडक्यात माहिती…
 
कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था गट यांना दरवर्षी राज्य शासनमार्फत विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तसेच राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या कृषी विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांस राज्यशासनाद्वारे प्रतीवर्षी पुररस्कार देऊन गौरविण्यात येते.  या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचे प्रस्ताव विहित पध्दतीने सादर केल्यानंतर त्याची छाननी होऊन या पुरस्कारांची घोषणा केली जाते. तद्नंतर कार्यक्रमाचे आयोजन करुन पुरस्कार प्रदान केले जातात.

 विविध कृषी पुरस्कार
 डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार कृषि क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रकीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप 75 हजार रोख तसेच स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार  असे असून प्रती वर्षी एका व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन व ग्रामीण विकास ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतकऱ्यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था, गटांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रोख तसेच स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार  असे असून प्रती वर्षी दहा असे हे पुरस्कार दिले जातात.

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रोख तसेच स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पतीसह सत्कार  असे असून प्रती वर्षी पाच महिलांना हा पुरस्कार दिला जातो.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ज्या व्यक्ती अथवा संस्था शेती, पत्रकारीतेद्वारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषी क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यक्तींना, संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.  या पुरस्काराचे स्वरुप 30 हजार रोख तसेच स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार  असे असून प्रती वर्षी तीन असे हे पुरस्कार दिले जातात.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, शेती पुरक व्यवसाय, स्वतऱ्च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व इतर शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण एकोणवीस व आदिवासी गटांतील सहा शेतकऱ्यांना, संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्कारने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 11 हजार रोख तसेच स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार  असे आहे.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या कृषि विभागातील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे आहे. प्रती वर्षी दोन असे  हे पुरस्कार दिले जातात.
महाराष्ट्र शासन, कृषी विभागाच्या मंडळ, तालुका, उपविभागीय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारांकरीता पात्र शेतकऱ्यांनी नियोजित वेळेत आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका स्तरावर सादर करावेत.  तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
                                                                                                                         संकलन-
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग
0000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक