होईल स्वप्नपूर्ती स्वच्छ महाराष्ट्राची हवी साथ आपल्या इच्छाशक्तीची

दिनांक :- 01 ऑक्टोबर 2016                                                        लेख क्र-44

होईल स्वप्नपूर्ती स्वच्छ महाराष्ट्राची
हवी साथ आपल्या इच्छाशक्तीची


महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला विशेष महत्व दिले होते त्यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली.  या अभियानास 2 ऑक्टोबर 2016 रोजी दोन वर्ष  पूर्ण होत आहेत.   स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे.  गेल्या दोन वर्षात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कामांचा आढावा घेणारा हा लेख...

देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची केवळ घोषणा केली असे नव्हे तर स्वत: सहभाग घेऊन या अभियानाची त्यांनी सुरुवात केली.  त्यानंतर देशभर स्वच्छतेच्या विविध मोहिम राबविल्या गेल्या आहेत.   राज्य शासनानेही स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु केले.  विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम कार्यक्रम राबविले गेले.   जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी गावे स्वच्छ असणे अत्यंत महत्वाचे आहे.  त्याचबरोबर नागरी भागही स्वच्छ असावा यासाठी शासनाने नागरी भागाच्या स्वच्छतेसाठी सप्तपदी-सहभागचा ठाम निर्धार, व्यापक लोकसहभाग मिळवणार, शंभर टक्के शौचालयाचा वापर करण्याचा प्रयत्न, कचऱ्याचे संकलन,  वर्गीकरण वाहतूक करणार, कचऱ्यांच शास्त्रोक्त प्रक्रिया करणार, स्वच्छ हरित महाराष्ट्र साकारणार असा स्वच्छतेचा हा कार्यक्रम राबविण्यात आला.
महत्वपूर्ण उद्देश
उघड्यावरील शौचविधी बंद करणे, हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्त करणे, नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणे, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निमार्ण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढविणे, भांडवली खर्च आणि ऑपरेशन आणि देखभाल यासाठी खाजगी संस्थांच्या सहभागासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे असा महत्वपूर्ण उद्देश या अभियानाचा आहे.   राज्यात 26 महानगरपालिका व 239 नगरपरिषदा अशा एकूण 265 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असून या सर्व नागरी स्थानिक संस्थांमधून दरदिवशी निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची आधुनिक व शास्त्रशुद्ध  पद्धतीचा अवलंब करून विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याबाबत राज्य शासनाने महानगरपालिका तसेच नगरपालिकांना आदेश दिलेले आहेत. त्यानुसार महानगर पालिका, नगर पालिकांनी काम सुरु केले आहे.      
2 ऑक्टोबर 2015 ते 26 जानेवारी 2016 दुसऱ्या टप्प्यात 32 नगर परिषदा व एक महानगरपालिका हागणदारी मुक्त, तीन शहरे संपूर्ण स्वच्छ, हागणदारीमुक्त नगर परिषदा, चिखलदरा, मुरुड-जंजिरा, पेण, कर्जत,  राजापूर, मालवण, काटोळ, मोहपा, रामटेक, उमरेड, महादुला, सुरुगड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, दुधणी, मंगळवेढा, अक्कलकोट, मेदगी, सांगोला,शिरपूर-वरवडे,फैजपूर,त्रिंबक शिर्डी,माथेरान, रोहा, महाड.  हागणदारीमुक्त महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका, संपूर्ण स्वच्छ शहरे-पाचगणी,  वेगुर्ला व देवलाली प्रवरा.  स्वच्छ महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे या शहरांनी टाकलेले यशस्वी पाऊल आहे.  इतरांना मार्गदर्शक ठरणार आहे.  स्वच्छतेचे चांगले काम करणाऱ्या व हागणदारीमुक्त व संपूर्ण स्वच्छ झालेल्या अ,ब, व क वर्ग नगर परिषदांना अनुक्रमे दोन,दीड व एक कोटी एवढे प्रेात्साहन म्हणून देण्यात येणार आहे. 
स्वच्छतादूत महिला
            वासिम जिल्ह्यातील संगीता आव्हाडे यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधले.  तर यवतमाळ जिल्ह्यातील चैताली राठोड यांनी लग्नात दागिन्या ऐवजी शौचालयाची मागणी व नाशिक जिल्ह्यातील सुवर्णा लोखंडे यांनी कर्ज काढून शौचालय बांधले.  या तिघींचाही मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करुन त्यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली.  हे इतरांसाठी स्फूर्तीदायक आहे. 
रायगड जिल्हा
            रायगड जिल्ह्यातील स्वच्छता अभियान, राज्याची जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ रायगड येथे झाला.  हे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.  तसेच राज्यातील स्वच्छता अभियानासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छता दूत म्हणून घोषित केले आहे.  या निमित्ताने रायगड जिल्ह्याला या मोहिमेत पुढाकार घेण्याची संधी मिळाली आहे.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.  यामध्ये रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला आणि अनेक पर्यटकांची पसंती असलेला अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सैन्य दालातर्फे ही मुरुड व अलिबाग समुद्र किनारा स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळा-महाविद्यालयांमध्येही स्वच्छता मोहिम घेण्यात आल्या. सर्व नगरपरिषदा स्वच्छता अभियानांतर्गत काम करीत आहेत.  रायगड जिल्हयातील रोहा, महाड, माथेरान मुरुड-जंजिरा, पेण, कर्जत नगरपरिषदा हागणदारी मुक्त घोषित झाल्या आहेत. इतर नगरपरिषदा ही त्यादृष्टीने काम करीत आहे.
स्वच्छ विभागासाठी कटिबध्द
            राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत कोकण विभागाला राज्यातील सर्व प्रथम स्वच्छ (हागणदारीमुक्त) महसूल विभाग होण्याचे सूतोवाच कोकण विभागीय आढावा बैठकीत केले.  त्यास विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन होकार दर्शविला. त्यामुळे येत्या काही दिवसात कोकण विभाग राज्यातील सर्व प्रथम स्वच्छ विभाग होईल यात शंका नाही.  नुकतेच कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छ जिल्हा म्हणून देशपातळीवर सन्मानित करण्यात आले आहे.
            महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत 17 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यातील समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी निर्मल सागर तट अभियान पंधरवडा राबविण्यात आला.  या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग,मुरुड,श्रीवर्धन, काशिद आदि समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहिम राबविण्यात आली.  या मोहिमेत 125 टन इतका कचरा जमा केला.   तसेच सागर व्यवस्थापन अभियान राबविण्यात येणार आहे.  स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत सहभागी होऊन 2019 पर्यंत स्वच्छ महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने काम करुन स्वच्छतेचे दूत झाल्यास उद्दिष्ट सहज साध्य होईल
0000
                                                         विष्णू काकडे
                                                              माहिती अधिकारी
                                                             रायगड-अलिबाग



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक