अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
दिनांक :- 30 सप्टेंबर 2016                                                                                               लेख क्र-43
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
विविध शिष्यवृत्त्या

            शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक प्रगती होण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौध्द घटकाच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत विविध शिष्यवृत्या देण्यात येतात. या शिष्यवृत्तीं विषयी माहिती देणारा हा लेख.. ..

शालेय विद्यार्थ्यांसाठी
            इयत्ता 5 वी ते 7 वी मधील 2 गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी असावा. ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परीक्षेत कमीत कमी 50 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल. या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट राहणार नाही. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित हजेरी, समाधानकारक प्रगती व चांगली वर्तणूक असल्यास मंजूर करण्यात येईल. ही शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या कालमर्यादेपुरतीच म्हणजे जून ते मार्च या 10 महिन्यांसाठी मंजूर करण्यात येईल. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात येईल. सदरहू शिष्यवृत्ती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद मंजूर करतील. या योजने अंतर्गत इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपयांप्रमाणे 10 महिन्यांच्या कालावधीसाठी 500 रुपये देण्यात येतील. तर 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपयांप्रमाणे 10 महिन्यांच्या कालावधीसाठी 1000 रुपये देण्यात येतील. या शिष्यवृत्ती योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधता येईल.
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
            मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्याथी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबींवरील शुल्क प्रदान करण्यात येते. दरमहा रु.230 ते रु.450 या दराने निर्वाह भत्ता देण्यात येतो. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु.380 ते रु.1200 निर्वाहभत्ता देण्यात येतो.
            या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर online अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तसेच संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.

राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

            अनुसूचित जाती नवबौध्द विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी इयत्ता 10 वी मध्ये 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वी 12 वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आहे.
            इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपयांची शिष्यवृत्ती 10 महिने कालाधीसाठी देण्यात येते. या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर online अर्ज भरणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा. )
शाहु महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती
            एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरिता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकीत व शासन मान्य शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना देण्यात येते.
लाभाचे स्वरुप
            संस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क. क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी रु.10 हजार.
            वरील दोन्ही योजनांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येतात. (अधिक माहितीसाठी आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्याशी संपर्क साधावा.)
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमा करिता प्रवेश मिळाला आहे, अशा 50 (पी.एच.डी.-21 व पदव्युत्तर-26) परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
अटी व शर्ती
            परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी पदव्यूत्तर पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण व प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्याने परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा. परदेशातील विद्यापीठ हे मान्यताप्राप्त विद्यापीठ असावे. पदव्यूत्तर पदवीमध्ये अभ्यासक्रमासाठी पदवीला किमान 50 टक्के गुण आवश्यक व प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
            विद्यापीठाने प्रमाणित केलेला शिक्षण फी ची पूर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस.डी. 1375 तर यु.के.साठी 1 हजार पौंड इतके देण्यात येतात. पुस्तके, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च (Shortest Route & Economy Class) तिकीट सादर केल्यानंतर मंजूर करण्यात येतो.  वरील सर्व शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
                                                                         0000                                                  
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय
रायगड-अलिबाग


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक