रोहा तालुक्याला लाभले जलयुक्त शिवाराचे वरदान

दिनांक :- 20 सप्टेंबर 2016                                                          लेख क्र- 35
रोहा तालुक्याला लाभले
जलयुक्त शिवाराचे वरदान


     सर्वसाधारणपणे  संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते. तर  रायगड जिल्ह्यात साधारणत: 50 हजार मि.मी. पाऊस वर्षाला पडतो.  खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात.  पण हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले  तर…तर काय? पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पेनुसार गतवर्षी पासून जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाची योजना राबविली. 
      एका महत्वाकांक्षी अशा जलुयक्त शिवार योजनेचा पाया पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भरभक्कम  ठरला.  रायगड जिल्ह्यातही 14 तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.    ही कथा आहे रोहा परिसरातील जलविकासाची, जलयुक्त शिवार अभियानाच्या यशाची....


महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबविली आणि मोठी जलक्रांतीच घडून आली.  सन 2019 पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली.  गतवर्षी 26 जानेवारीला या योजनेचा  राज्यस्तरीय शुभारंभाचा सन्मान रायगड जिल्ह्याला मिळाला.   पाहता पाहता जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची कामे सुरु झाली आणि या जलयुक्त शिवार अंतर्गत गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये 945 कामे पूर्ण करण्यात आली.
 लाभदायक जलुयक्त शिवार
सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 च्या अंतर्गत राज्यातील टंचाई परिस्थितीवर कायम स्वरुपाची मात करण्यासाठी आपल्या शासनाने जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार हे अभियान राबविले. महाराष्ट्र राज्यात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषिक्षेत्रावर  होत आहे.  या सर्व बाबींचा विचार करता जलयुक्त शिवाराची योजना राज्यात साकारली गेली. अगदी रोहा तालुक्यात 105 कामे पूर्ण झाली असून यात सलग समतर चर-10, माती नाला बांध -2, अनघड दगडी बांध-2, शेततळे-6, सिमेंट नाला बांध-60, वळण बंधारे-7, सिमेंट नाला बांध-14, सिमेंट नाला बांधकाम खोलीकरण-8 अशी एकूण 105 कामे करण्यात आली.   यासाठी अंदाजे  2 कोटीच्या आसपास खर्च करण्यात आला.    विरझोली, खोपे व पाथरशेत, चणेरा येथे जलयुक्त शिवाराचे काम केले आहे.   या कामांमुळे 278 टी.सी.एम.अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.   यामुळे बोरवेल, विहिरी व नाल्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले. परिणामी   मत्स्यव्यवसाय तसेच भाजीपाला व शेती होऊ लागली आहे.  जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 100 हेक्टरच्या आसपास जमीन सिंचनाखाली येत आहे.
           
विरझोली येथे कृषी विभागामार्फत कोरडवाहू क्षेत्र विकास अंतर्गत शेततळे करण्यात आले.  या भागात 72 लाखांचा निधी खर्च करण्यात आला.  त्यात  4 सिमेंट बधारे, 1 माती नाला, 44 शेततळे खोदण्यात आले. महत्वाचे म्हणजे  विरझोली ग्रामपंचायत हद्दीतील बोरवेलला भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे.  तर चणेरा परिसरातील खोपे येथे जलयुक्त शिवारमधून 60 लाखांच्या निधीच्याद्वारे 3 सिमेंट नाला, 1 माती नाला, 16 शेततळे, 7 वळण बंधारे बांधण्यात आले.
एकूणच या कामांमुळे या सर्व  परिसरातील 100 हेक्टरच्या आसपास क्षेत्र पाणलोटखाली येत आहे.   विहिरींना चांगले पाणी उपलब्ध होते भातशेती सोबतच भाजीपाला शेती करुन नगदी उत्पन्नात वाढ त्याचप्रमाणे तलांवामध्ये पाणीसाठा व्यवस्थित साठल्यामुळे मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळाली असून स्थानिकांना त्याचा लाभ होत आहे. मत्स्यव्यवसाय विकसित करण्यासाठी मत्स्यबीज शेतकऱ्यांना वितरीत करुन मत्स्यव्यवसाय वाढण्यास सुरुवात झाली आहे.
जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील, शिवारातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे.  शाश्वत पाणी मिळण्याची व्यवस्था निर्माण होत आहे.  पाणी टंचाई कमी होताच शेतकऱ्यांना शेती बरोबरच भाजीपाला व शेतीला पुरक अशा व्यवसायात सुध्दा वाढ होऊन शेतकरी समुध्दीच्या दिशेने वाटचाल करुन लागला आहे.
जलयुक्त शिवाराची  किमया न्यारी
विकासाची गंगा  येईल घरोघरी !
00000000
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                रायगड-अलिबाग








Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक