समाज उभारणीत पत्रकार महत्वाचा जबाबदार घटक - जेष्ठ पत्रकार मधुकर भावे

दिनांक :- 23/09/2016                                                                वृ.क्र.६२३
समाज उभारणीत पत्रकार
महत्वाचा जबाबदार घटक
                                                     - जेष्ठ पत्रकार मधुकर भावे




अलिबाग दि.23 (जिमाका) समाज उभारणीत पत्रकार हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याने प्रत्येक बातमीच्या मागे आपण समाजाला काय देणार याचा विचार केला पाहिजे. पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बातमी केली पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक मधुकर भावे यांनी आज येथे केले.
पत्र सूचना कार्यालय मुंबई आणि जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे आयोजित केलेल्या ग्रामीण माध्यम पत्रकारांची कार्यशाळा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सूचना व पत्र संचालनालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.मधुकर भावे पुढे म्हणाले की, पत्रकाराने समाजात ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या लोकांसमोर आणल्या पाहिजेत, समाजातील लहान-लहान माणसे करत असलेल्या सामाजिक कामांना प्रसिध्दी देऊन त्यांना लोकांपर्यंत आणले पाहिजे, आपली बातमी समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचणे हाच खरा पत्रकारांसाठी मोठा पुरस्कार आहे असे मी मानतो. असे सांगून ते पुढे म्हणाले की, संवेदनशील बातमी देतांना पत्रकारांनी नेहमी त्याची सत्यता आणि दुसरी बाजू जाणून घेतली पाहिजे. पत्रकारांनी चुकीच्या बाबींवर टिका जरुर करावी. परंतु टिका करत असताना आपला हेतू शुध्द असला पाहिजे. त्यातून दुरुस्ती होणे, ती करुन घेणे ही आपली भूमिका असायला पाहिजे. पत्रकारांनी त्यांच्या बातमीची विश्वासहर्ता निर्माण होईल असे काम करायला पाहिजे. तसेच विकासात आपले योगदान देऊन पत्रकाराचे दायित्व हे जनतेसाठी असले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.
 निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यावेळी बोलताना म्हणाले की, शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यानंतर योजना लोकांपर्यंत पोहचतात, योजनांची अंमलबजावणी करणे सोपे होते. त्याच बरोबर योजने मधील उणिवा, फिड बॅक मिळतो, योजनेची मागणी वाढते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नितीन सप्रे यांनी सांगितले की, पत्र सूचना कार्यालया मार्फत देण्यात आलेल्या बातम्या, केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे व्हावे, माध्यम प्रतिनिधींशी संवाद वाढवा आणि प्रसिध्दीचे काम सुलभ व्हावे. माध्यमांची भूमिका समजून या कार्यशाळेचे (वार्तालाप) आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजा संदर्भात तसेच केंद्र  सरकारच्या योजना संदर्भात सादरीकरण केले.
आपत्ती परिस्थितीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असते, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पत्रकारांनी बातमी देताना त्याबाबत खातरजमा करावी. कारण आपल्या बातमीने समाजामध्ये चुकीचा संदेश जाता कामा नये, शासकीय यंत्रणा मार्फत येणाऱ्या बातम्या, योजना यामधील समाजाच्या लाभाच्या संदर्भात असणाऱ्या बातम्या अधिक प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. त्यामुळे अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभधारक पुढे येतील. समाज माध्यमातून येणाऱ्या बातम्या पुढे पाठवितांना अतिशय सावध व जागृत असणे महत्वाचे आहे. असे लोकमत समुहाचे कोकण विभागीय समन्वयक जयंत धुळप यांनी आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये  प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर बोलताना मत व्यक्त केले.
बातमीला दोन बाजू असतात.  त्यामुळे पत्रकारांनी बातमी देताना विचारपूर्वक बातमी दिली पाहिजे.  आपली बातमी संपादकाशी बोलली पाहिजे. ग्रामीण भागातील माध्यमे टिकली पाहिजेत ती अधिक सशक्त झाली पाहिजेत.   अलिकडच्या काळात पेपर वाचण्यापेक्षा पेपर बघण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे वाचकाची नजर बातमीपर्यंत गेली पाहिजे.  माध्यमांमध्येही स्पर्धा आहेत. बदलत्या काळानुसार नव्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. शासकीय प्रसार माध्यमांच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने उपयोग करुन घेतला पाहिजे असे दैनिक रामप्रहरचे संपादक मदन बडगुजर यांनी ग्रामीण भागातील माध्यमांची भूमिका या विषयावर बोलताना  विचार  व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माहिती जलदगतीने माध्यमांपर्यंत  पोहचावी यासाठी फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, व्हॉटसअप अशा समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे.  माध्यम संवाद व संवादपर्व असे उपक्रम राबवून प्रसार माध्यमांना  माहिती देण्यात येत असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात माहिती देताना सांगितले.
नितीन सप्रे यांनी माध्यम प्रतिनिधीनीशी संवाद साधण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून  पत्र सूचना  कार्यालयामार्फत विविध योजना व निर्यणाची माहिती जिल्हा व तालुका स्तरावरील माध्यमापर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल. माध्यमांनी मागणी केलेली माहिती  संबंधित विभागाकडून  घेऊन त्यांना देता येईल असे माध्यम संवाद या सत्रात सांगितले.
आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा उपयुक्त असल्याचे उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी वार्तालाप करताना सांगितले. अशाच प्रकारे कार्यशाळेचे आयोजन ग्रामीण स्तरावर करावे अशा सूचना ही केल्या. उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि प्रमुख वक्त्यांचे आभार माहिती अधिकारी विष्णू काकडे यांनी मानले.
 या कार्यशाळेसाठी जिल्हयातून वृत्तपत्रांचे व साप्ताहिकांचे संपादक व पत्रकार उपस्थित होते. पत्र सूचना कार्यालय, मुंबईचे माध्यम समन्वयक कन्हैया नुनसे व  जिल्हा माहिती कार्यालयाचे हिरामण भोईर, विठ्ठल बेंदुगडे, सचिन काळुखे, जयंत ठाकूर, सचिन राऊत, अशोक मोरे, शशिकांत भोसले यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
000000






Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक