वादपर्व माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एन.माने

दिनांक :-  08 सप्टेंबर  2016                                                     वृत्त क्र. 588
संवादपर्व
माझी कन्या भाग्यश्री
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
                                       -  उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एन.माने

            अलिबाग दि.08, मुलींचा जन्म दर वाढविणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहान मिळावे, बाल विवाहला प्रतिबंध व्हावा इत्यादी उद्देश ठेवून माझी कन्या भाग्यश्री योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एन.माने यांनी आज येथे केले.
            शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहोचावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत संवादपर्व हा उपक्रम राज्यात सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग व जिल्हा माहिती कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने चेंढरे गावातील मरुआई नगर, रोहिदासनगर, येथील अष्टविनायक मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सभामंडपात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात माहिती देताना व्ही.एन.माने बोलत होते. यावेळी चेंढरे ग्रामपंचायत उपसरपंच परेश देशमुख, सदस्य मिथुन बेलोसकर, प्रशांत फुलगावकर, माहिती अधिकारी विष्णू काकडे, महिला व बाल विकास विभागाचे क.प्रशासन अधिकारी सुनिल वराट, मंडळाचे अध्यक्ष विजय स्वामी, खजिनदार जितेंद्र वाघ, परिसरातील महिला व नागरीक उपस्थित होते.
            माजी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत एका मुलीनंतर किंवा दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेत पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे रु. 1 लाख अपघात विमा व रु.5 हजार पर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल. मुलीच्या नावावर शासनमार्फत एलआयसी कडे रु.21,200/- चा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रु. 1 लाख विम्याची रक्कम देण्यात येईल. मुलीचा जन्म झाल्यानंतर, 1 ली ते 5 वी, 6 वी ते 12 वी, वयाच्या 18 वर्षी अशा विविध टप्प्यात योजने अंतर्गत विविध लाभ देण्यात येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग  व तालुका स्तरावर एकात्मिक बाल‍ विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असेही श्री.माने यांनी यावेळी सांगितले.
             माझी कन्या भाग्यश्री योजनेची माहिती देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला असून हा  चित्ररथ जिल्हयात विविध ठिकाणी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी जावून योजनेची माहिती देत आहे. आज संवादपर्व कार्यक्रमाच्या ठिकाणीही चित्ररथाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक