आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन योजना सहभाग घेण्याचे आवाहन

दिनांक :- 16 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 726

आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला
 व व्यवस्थापन योजना सहभाग घेण्याचे आवाहन

अलिबाग,दि.16 (जिमाका) कृषि विभागामार्फत कोकण विभागात राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन ही योजना 15 नोव्हेंबर 2016 ते 31 मे 2017 या कालावधी मध्ये सुरु करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवळी कृषि विद्यापीठातील शास्त्राज्ञांमार्फत विविध किड व रोगांवर मार्गदर्शन मिळणार आहे.  उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली यांचे अंतर्गत सदर योजनेसाठी कर्जत, खालापूर,पनवेल व उरण या तालुक्यांचा समावेश  करण्यात आलेला आहे.  या चारही तालुक्यात किड सर्व्हेक्षक व मॉनिटर यांच्यामार्फत आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागांचे सर्व्हेक्षण करुन त्यामध्ये आंब्यावरील तुडतुडा, फुलकिडे,फळमाशी, भुरी व करपा इत्यादी किड व रोगाबाबत निरीक्षण घेऊन त्यांना वेळीच सल्ला देऊन संभाव्य नुकसान टाळणे शक्य होणार आहे.  किड व रोग प्रादुर्भावीत क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत शासनामार्फत 50 टक्के अनुदानावर औषधांचा व फळमाशी गंधी सापळयांचा पुरवठा करण्यात येणार आहे. 
आंबा मोहर संरक्षण वेळापत्रक
पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रिन 2.8 टक्के प्रवाही इतके प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी 9 मि.ली.घ्यावयाचे आहे.  या फवारणीमुळे पावसाळयानंतर कोवळया फुटीवर येणाऱ्या  तुडतुडयांपासून संरक्षण होते.  पोपटी रंगाच्या पालवीवर तुडतुडे असल्यासच फवारणी करावी.  तसेच करपा रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास 50 टक्के कार्बेडेझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.    दुसरी फवारणी (बोंगे फुटताना) लॅम्बडा सायहेलोथ्रिन 5 टक्के 10 लिटर पाण्यासाठी 6 मि.ली.घ्यावयाचे आहे. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने 5 टक्के हेक्झॅकोनॅझोल 5 मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधकाची  20 ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 50 टक्के कार्बेडेझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.   तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने) इमिडाक्लोप्रीड 17.88 टक्के प्रवाही इतके प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी 3 मि.ली.घ्यावयाचे आहे.    चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने) थायोमेथॉक्झाम 25 टक्के (WDG) इतके प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी 1 मि.ली.घ्यावयाचे आहे.  पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने) डायमेथोएट 30 टक्के प्रवाही किंवा लॅम्बडा सायहेहोथ्रिन 5 टक्के इतके प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी 10 व 6 मि.ली. मि.ली.घ्यावयाचे आहे.  तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस किटक नाशकाच्या द्रावणात या फवारणीमध्ये भुरी  रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने 5 टक्के हेक्झॅकोनॅझोल 5 मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधकाची 20 ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी  50 टक्के कार्बेडेझीम  10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.  सहावी फवारणी (पाचव्या फवारणीनंतर गरज 15 दिवसाच्या अंतराने) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या किटकनाशकापैकी न वापरलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी.  तुडतुडयांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली पाडूंरंग सिगेदार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक