मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी -राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया

दिनांक :- 17 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 730
मतदार जागृती व आचारसंहितेची
प्रभावी अंमलबजावणी करावी
                                                  -राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया

                अलिबाग दि. 17 : (जिमाका) नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकां संदर्भातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या चार जिल्ह्यांच्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
            या बैठकीला आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अपर पोलीस महासंचालक एस.पी.यादव, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी,  सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी  उदय चौधरी, पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर,  रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, रत्नागिरीचे प्रणय अशोक, पालघरच्या  शारदा राऊत, सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, अपर जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच निवडणुक निर्णय अधिकारी  व  संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सहारिया म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यात या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 2016 रोजी मतदान होत आहे.     या निवडणुका निर्भय, भयमुक्त, पारदर्शीपणे व्हाव्यात यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.  जिल्ह्यात सर्व ठिकाणी भरारी पथके, तापसणी नाकी याची व्यवस्था करण्यात आली आहे.   उमेदवाराची 70 टक्के नामनिर्देशन संगणकाद्वारे घेण्यात आली आहेत.  मतदान झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने 30 दिवासाच्या व राजकीय पक्षांनी 60 दिवसांच्या आत खर्चाचा तपशिल सादर करणे आवश्यक आहे. कोकण विभागातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची तयारी योग्य रितीने होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. 
            या निवडणुकांच्या तयारी संदर्भात विभागीय पातळीवर आढावा बैठका घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूकसंदर्भातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा व सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तू अथवा पैशाच्या स्वरूपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणे; तसेच बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबतदेखील मतदार जागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
            आपल्या  प्रास्ताविकात कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी चार जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकां विषयी सविस्तर माहिती  दिली.  तर रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी  उदय चौधरी, पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी  आपआपल्या जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकां विषयी  संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.   रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, पालघर या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी निवडणुका कालावधीत कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे राहील याची दक्षता घेण्यात आली आहे असे सांगितले. 
            कोकण विभागातील  पालघर जिल्ह्यात नगर परिषद संख्या-3, सदस्य संख्या-51, प्रभाग संख्या-51, मतदान केंद्राची संख्या-51, एकूण मतदार 9 हजार 430 असून  निवडणुक लढविणाऱ्या नगर सेवकांची 147 अशी आहे.   रायगड जिल्ह्यात नगर परिषद संख्या-9, सदस्य संख्या-170, प्रभाग संख्या-81, मतदान केंद्राची संख्या-257, एकूण मतदार 1 लाख 85 हजार 170  असून  निवडणुक लढविणाऱ्या नगर सेवकांची 528 व नगरध्यक्ष संख्या 41 अशी आहे.   रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद संख्या-5, सदस्य संख्या-107, प्रभाग संख्या-61, मतदान केंद्राची संख्या-156, एकूण मतदार 1 लाख 17 हजार 250  असून  निवडणुक लढविणाऱ्या नगर सेवकांची 285 व नगरध्यक्ष संख्या 12 अशी आहे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद संख्या-4, सदस्य संख्या-68, प्रभाग संख्या-41, मतदान केंद्राची संख्या-74, एकूण मतदार 52 हजार 66  असून  निवडणुक लढविणाऱ्या नगर सेवकांची 256 व नगरध्यक्ष संख्या 21 अशी आहे.  
00000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक