क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रामाची आवश्यकता -देवदत्त नागे

क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी
कठोर परिश्रामाची आवश्यकता
                                                                                    -देवदत्त नागे


             अलिबाग दि.21:- (जिमाका)  -    क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन जय मल्हार मालिकेतील  श्री खंडेराय यांची भुमिका साकारलेले  देवदत्त नागे यांनी राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी  केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य च्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने नेहुली येथील क्रीडा संकुलात दि. २० ते २२ नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे उदघाटन देवदत्त नागे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  
                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिवछत्रपती पुरस्कार विजेते संघटक नथुराम पाटील, मुंबई विभागाचे क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे प्रमोद चांदुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, मुंबई जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या पुनम महात्मे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
               खेळाडूंना मार्गदर्शन करतांना श्री.नागे म्हणाले की,  खेळाडूंनी व्यसनापासून दुर राहुन सातत्यपुर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. खेळाडूंच्या जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे असून खेळाडूंनी त्यांचे गुरु व आई वडीलांचा आदर करावा.   वेळेचे महत्व ओळखणे गरजेचे असून खेळाडूंच्या अंगी  सरावामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम, व गुरुला दिलेले वचन पाळल्यास यशस्वी होणे सोपे होईल. सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी श्री.नागे यांनी यावेळी शुभेछा दिल्या.
                प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी अलिबाग येथील क्रीडा संकुलात आयोजित केलेली राज्यस्तरीय शालेय स्पर्धा अत्यंत महत्वाची असून  या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ  मध्यप्रदेश  येथे  होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी
महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ अशा एकुण नऊ विभागातून ४५० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
  विविध जिल्हयांतून आलेल्या खेळाडूंचे संचनल होऊन उपस्थित पाहुण्यांना पोलीस बँडच्या पथकासह  मानवंदना देण्यात आली.या स्पर्धेच्या प्रारंभी देवदत्त नागे यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला .तर शिवछत्रपती क्रीडापीठाचा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू सुखमणी बाबरेकर याने खेळाडूंना शपथ दिली. तर शेवटी क्रीडा अधिकारी घनशाम राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

                                                                       000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक