मुलगा आणि मुलगी यात फरक मानणारी मानसिकता बदलणे आवश्यक ---सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

दिनांक:-30/11/2016                                                            वृत्त क्र. 765
मुलगा आणि मुलगी यात फरक 
मानणारी मानसिकता बदलणे आवश्यक
                        ---सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

अलिबाग दि.29:- (जिमाका)  आपल्या अपघातानंतर प्रबल इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभी राहत इंग्लड ते महाड असा 32 हजार कि.मी.प्रवास एकटयाने करणारी भारतीय महिला ही किती सक्षम आहे हे भारुलता कांबळे यांच्या बेटी बचाओ,बेटी पढाओ या मोहिमेद्वारे सिध्द झाले आहे.  त्यामुळे मुलगा  व मुलीमध्ये भेद करणारी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ मत्री राजकुमार बडोले यांनी  आज येथे केले. 
श्रीमती भारुलता कांबळे यांनी इंग्लड ते भारत असा एकटीने कार प्रवास करुन  मुलगी वाचवा,मुलगी शिकवा तसेच महिला सक्षमीकरणाबाबत जागृती करण्याचे काम करत आहेत.  त्यांच्या विश्वभ्रमंतीची सांगता करणाऱ्या कार्यक्रमात भारुलता कांबळे यांचा सत्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक  महाड येथे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार भरत गोगावले, नवनिर्वाचित महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, माजी आमदार माणिकराव जगताप, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, तहसिलदार औदुंबर पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार  तसेच विविध विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री महोदय श्री.बडोले म्हणाले की, भारतात जो गाडी चालवेल तो जगात कुठेही गाडी चालवू शकतो.     गाडी चालवताना, सुरु असतानाही सुरक्षित गाडी चालविणे ही कसब येथील चालकाला असते अशा शब्दात त्यांनी देशातील चालकांचा गौरव केला.  आपल्या देशात मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आणि शिक्षण मध्येच सोडण्याचे प्रमाण जास्त असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले  हे स्मारक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र व्हावे, स्मारकातील गाळे कर्मिशियल वापरासाठी देणे आदि उद्देश नव्याने अंमलात आणण्याच्या दृष्टीने बार्टीला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाहन चालवणे हा माझा छंद आहे. अपघातानंतर घाबरुन न जाता मी मोटार मॅकेनिक व प्रथम उपचाराचे प्रशिक्षण घेतले आणि महिला सक्षमीकरणासाठी विश्वभ्रमंती सुरु केली.  या वाहन चालविण्याच्या छंदामुळेच मला जगण्याची जिद्द मिळाली असल्याचे सत्कार उत्तर देताना श्रीमती भारुलता कांबळे यांनी सांगितले.
इंग्लड ते भारत असा एकटीने कार प्रवास करुन  श्रीमती भारुलता कांबळे यांनी जनजागृतीचे काम केले आहे.  महिला सक्षमीकरणा बरोबरच भारत व ब्रिटन या देशांमध्ये मैत्री, सदभावना,व्यापार वाढविणे हे ही श्रीमती कांबळे यांच्या इंग्लड ते भारत या प्रवासामागची संकल्पना आहे.   त्यांचा हा प्रवास उत्तर ध्रुव, दोन वेगवेगळे खंड, नऊ टाईम झोन,तीन वाळवंट, नऊ  पर्वत रांगा आणि 32 देशांमधून  प्रवास झाला आहे.  त्यांचा भारत प्रवास जुलै 2016  मध्ये सुरु झाला असून प्रवासाला 75 दिवस लागले आहेत.  श्रीमती भारुलता कांबळे या मूळच्या गुजरात मधील नवसारी येथील  आहेत.  त्यांचे सासर महाड आहे.  सध्या त्या अनिवासी भारतीय म्हणून इंग्लड येथे राहत आहेत.   त्या व्यवसायाने वकील आहेत.  त्यांचा हा प्रवास महाड येथे संपत असल्याने आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक न्याय व विशेष   सहाय्य विभागामार्फत सत्कार आला आहे.  
कार्यक्रमाचे  प्रास्ताविकात बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.   तर सूत्रसंचालन पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे यांनी केले.  कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमास महाड शहरातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी,विद्यार्थींनी  मोठया संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक