ग्राहकांनी सदैव जागरुक असणे आवश्यक --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

ग्राहकांनी सदैव जागरुक असणे आवश्यक
                                                      --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले



अलिबाग दि.28:- (जिमाका :  ग्राहक म्हणून असलेला आपला हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने सदैव जागरुक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.  या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस.आर.साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य मकरंद जोशी, भगवान ढेबे, मानवतावादी ग्राहक परिषदेचे अध्यक्ष मुस्ताक घट्टे  तसेच परिषदेचे सदस्य, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले म्हणाल्या की, आपण सगळेच ग्राहक आहोत.  सकाळपासून  रात्री पर्यंत आपण विविध जीवनाश्यक वस्तू खरेदी करत असतो.  ग्राहक म्हणून आपण वस्तू खरेदी करतो त्यावेळी ज्या मूल्याला आपण वस्तू खरेदी करतो त्याचे मूल्य योग्य आहे किंवा नाही तसेच एखादी सेवा घेतो त्यावेळी त्याचे मूल्य योग्य आहे किंवा नाही हे ग्राहकाने पाहणे महत्वाचे आहे.   एमआरपी म्हणजे काय एमआरपी पेक्षा किंमत कमी करता येते का याबाबतची माहिती ग्राहकाला असणे आवश्यक आहे.   ग्राहकाला आपले हक्क  माहिती असले तरच तो आपली तक्रार ग्राहक तक्रार मंचाकडे करु शकतो.   ग्राहकाला त्याच्या हक्का विषयी  माहिती करुन देणे,त्याला सक्षम करणे महत्वाचे आहे.  ग्राहकाला आपल्या तक्रारीचे निराकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी तक्रार निवारण यंत्रणा सुध्दा सक्षम झाल्या पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे कशा प्रकारच्या तक्रारी येतात याचा या परिषदेच्या सदस्यांनी गोषवारा जाणून घेऊन सदस्यांनी आपण कुठे कमी  पडतो ते पाहून त्या विषयात अधिक जागृती करण्याचे काम सदस्यांनी करावे.  ग्राहकाला त्याच्या हक्काची  जाणिव फार कमी असल्याचे दिसून येते.  ग्राहकाला त्याचे कर्तव्य व हक्क तसेच कायद्याच्या तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे असे असेल तरच अपेक्षित परिणामकारक निकाल येतील असे उमेश जावळीकर यांनी यावेळी सांगितले. 
एस.आर.साळुंखे यावेळी म्हणाले की,जन्मापूर्वीपासूनच मनुष्याला औषधाची गरज लागते.  आपणाला लागणारी सर्व औषधे आपण निर्माण करतो.  तसेच काही प्रगत देशांना सुध्दा औषधे पुरवितो.  एकंदरच औषधांची परिस्थिती चांगली आहे.  जीवनाश्यक असलेली औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्या आहेत.   औषधा संदर्भात प्रत्येक ग्राहकाने जागरुक रहाणे आवश्यक आहे.  औषधासंदर्भातील आलेल्या तक्रारींचा योग्य पाठपुरावा करण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे यांनी प्रास्ताविकात ग्राहक दिन व ग्राहकाच्या हक्का संदर्भातील कायद्याची माहिती दिली.  याप्रसंगी मकरंद जोशी, मुश्ताक घट्टे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात  दिपप्रज्वलनाने आणि जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने करण्यात आली.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक