आदिवासी संवाद जिल्हा माहिती कार्यालयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम

दिनांक:- 08/12/2016                                                                                       वृत्त क्र. 788
आदिवासी संवाद
जिल्हा माहिती कार्यालयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम
                                                                       

                     
अलिबाग दि.08:- (जिमाका) आदिवासींच्या कल्याणासाठी  विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येतात.  या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासी संवाद हा नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग मार्फत  राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. नुकतीच या उपक्रमाची सुरुवात जेएसएम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने करण्यात आली.
  जेएसएम महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत ग्रामस्वच्छता, जनजागृती तथा विशेष श्रमसंस्कार, सात दिवसीय निवासी शिबीर तळवली ता.अलिबाग येथे 5 ते 11 डिसेंबर 2016 या कालावधीत आयोजित  करण्यात आले आहे.  या कार्यक्रमांतर्गत आदिवासी संवाद हा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग जेएसएम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला  होता.  या उपक्रमाची सुरुवात काल अलिबाग तालुक्यातील तळवली येथील सागाव आदिवासी वाडी येथे करण्यात आला.
आदिवासी संवाद 7 कलमी उपक्रम
 आदिवासी  संवाद सात कलमी उपक्रम पुढीलप्रमाणे,  1 )  आदिवासी ग्रामस्थांस योजनांची चित्रफित दाखविणे, 2 ) शासनाच्या लोकराज्य मासिकाचे वाटप करणे,  3 ) विविध योजनाबद्दल प्रत्यक्ष संवाद,  4 )      अडीअडचणी व समस्यांचा उहापोह 5 )  संवादा बरोबर कृती, 6 ) वैयक्तिक जबाबदारी, 7 ) कार्यपूर्ती.
  प्रारंभी तळवली येथील निवासी शिबीराच्या ठिकाणी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर  म्हणाले की, एनएसएसच्या माध्यमातून समाज सेवा करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.  निवासी शिबीरामधून विद्यार्थ्यांना सामाजिक  कार्याची जाणिव निर्माण होते.  या सात दिवसाच्या शिबीरात विद्यार्थ्यांनी  आदिवासी गावात आपल्या श्रमदानातून जनतेला सुविधा  उपलब्ध करुन देण्याचे हाती  घेतलेले काम प्रशंसनीय आहे.  आदिवासी संवाद हा शिबीराचा एक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी आदिवासी वाडीवर जाऊन  आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आदिवासींची एक समस्या दत्तक घेऊन ती सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करावा.  या कामात जिल्हा माहिती कार्यालय विद्यार्थ्यांना मदत करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.   प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक समस्या सोडविली तर या शिबीराचे सार्थक होईल असेही ते म्हणाले.  या प्रसंगी माहिती  अधिकारी विष्णू काकडे, प्राध्यापक के.एम.कुलकर्णी  प्रा.डि.जी.खंदारे उपस्थित होते.
काल झालेल्या आदिवासी संवाद या कार्यक्रमांतर्गत आदिवासी ग्रामस्थांना योजनांची माहिती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत निर्मित  करण्यात आलेल्या गगन भरारी, संधी रोजगाराची, आपलं शिवार  या शैक्षणिक, औद्योगिक व कृषि विषयक योजना असलेले माहितीपट  दाखविण्यात आले.   विद्यार्थ्यांनी आदिवासींसी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  तसेच आदिवासींना  लोकराज्य मासिकाचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक