मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:- 24/01/2017                                                                                                  वृत्त क्र. 46
मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी
सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे
                                                      --जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.24 :- (जिमाका) जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शिक्षक मतदार संघात होणारी निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात होण्यासाठी  तसेच या काळात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावे, अश्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या. 
जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात  आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर,  अतिरिक्त  मुख्य   कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात दोन निवडणुकांची आचार संहिता सुरु आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत कुठेही आचार संहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आचार संहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत.  याबाबत येणाऱ्या तक्रारीचे निराकरण करावे.  संवेदनशील मतदार केंद्र शोधून त्याची यादी तयार करावी व त्यानुसार तेथे बंदोबस्ताचे नियोजन करावे.  आवश्यक त्या ठिकाणी सी.सी.टीव्ही लावावेत. भरारी पथकाची नेमणूक करावी. परवाना असलेली शस्त्रे जमा करण्यासाठी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूकी संदर्भात लागणारे विविध परवाने देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा निश्चित करण्यात आली आहे.  त्यानुसार कार्यवाही करावी. 
तपासणी नाके
अवैध मद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आवश्यक ठिकाणी या यंत्रणेला पोलीस संरक्षण देण्यात यावे.  तसेच महत्वाच्या ठिकाणी रोकड वाहतूक व लिकर वाहतुक याची तपासणी व्हावी यासाठी तपासणी नाके सुरु करावेत. निवडणूक मुक्त व निर्भय  वातावरणात होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पात्र मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जे अधिकारी, कर्मचारी निवडणूक काळात कर्तव्यावर आहेत त्यांच्यासाठी  टपाली मतदानाची योग्य  व्यवस्था करावी. उमेदवारांनी अर्ज भरणे, अर्ज स्वीकारणे ,अर्जाची छाननी करणे त्यावर होणारे आक्षेप तसेच मतदान आणि मतमोजणी याबाबतच्या प्रशिक्षणाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
तर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी पोलीस विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाय-योजनाबाबत  माहिती  दिली.
या बैठकीसाठी निवडणूकीसंदर्भातील जिल्हयाचे इतर यंत्रणेचे अधिकारी, महावितरणचे अधिक्षक अभियंता फारुख शेख, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड- विलास सातपुते, अलिबाग- विलास पाटील, पनवेल- रा.सु.मोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल आनंद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, आदि उपस्थित होते. 

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक