निर्भय,मुक्त व पारदर्शी निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

निर्भय,मुक्त व पारदर्शी
निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
                                                     ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

अलिबाग दि.13 (जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका-2017 निर्भय, मुक्त,पारदर्शीपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेसाठी एकूण 59 गट  तर  पंचायत समितीसाठी 118 गण आहेत.  1 हजार 940 मतदान केंद्र आहेत.  233 झोन बनविण्यात आले आहेत.   मतदान 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे. आचार संहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.    चेकपोस्ट, भरारी पथक, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात आली आहे.  चेकपोस्टवर या टीममार्फत तपासणी करण्यात येणार आहे. पेडन्यूज संदर्भातील तक्रारी तसेच जाहिरात प्रसारण परवानगी देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक खिडकी योजनेंतर्गत परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.   या निवडणुकीसाठी एकूण पाच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.   संवेदनशील  मतदान केंद्राची यादी तयार करण्यात आली असून या मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे.  निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्र जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यावेळी म्हणाले की, जिल्ह्यातील निवडणूका शांततेत व निर्भयपणे पार पडाव्या यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  पोलीस पथकाबरोबर 450 होमगार्डची मदत घेण्यात येणार आहे.  तसेच राज्य राखीव दलाचे पोलीस टीम सुध्दा बंदोबस्तात असणार आहे.   95 पोलीस झोन तयार करण्यात आले आहेत.   ते एक ते दीड तासात  सर्व मतदान केंद्राची तपासणी करु करतील.  तसेच तीस लोकांच्या चार टीम तयार करण्यात आल्या असून कुठलीही अनुसूचित घटना घडल्यास केवळ अर्धा ते एक तासात ते घटनास्थळी पोहचू शकतात. मागील निवडणूकीचा आढावा घेऊन गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींना नोटीस देऊन तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले आहे.   तसेच  निवडणूक काळात तडीपार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक