सण उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

सण उत्सव काळात शांतता
कायदा सुव्यवस्था राखावी
                                                      -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले


अलिबाग दि.13 (जिमाका) :- आगामी  काळातील सण उत्सवाच्या वेळी रायगड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी सर्वांनी दक्ष रहावे असे आवाहन  जिल्हाधिकारी  श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.   आगामी काळात येणाऱ्या सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक तसेच समिती सदस्य, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे आदि उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना त्या पुढे म्हणाल्या की, आगामी काळात येणारे सर्व सण, उत्सव शांततेत व आनंदीमय वातावरणात पार पाडावेत.  एकात्मता ही आपली शक्ती आहे. तिचे दर्शन या काळात होणे आवश्यक आहे. तसेच   गावांगावामध्ये स्थानिक स्वरुपाचे  काही तंटे  असतील तर ते स्थानिक पातळीवरच  मिटवावेत.  त्याठिकाणी जर अडचण आली तर वरिष्ठ पातळीवर ते मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल. एकूणच  आगामी काळातील सर्व सण व उत्सव  सर्वांच्या सहकार्याने योग्य रितीने साजरे करुन जिल्हयात शांतता व सुव्यवस्था राखावी.
जिल्हा पोलीस अधिक्षक
  ज्या योगे समाजात तेढ निर्माण  होईल असा सोशल मिडियावर  आलेला आक्षेपार्ह मजकूर कोणत्याही स्थितीत लाईक अथवा फॉरवर्ड करु नये.   याकडे विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.  प्रामख्याने  युवा वर्गाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.  माहिती तंत्रज्ञान अंतर्गत असलेले कायदे हे खूप कडक असल्याने असे काही घडल्यास त्याचा  परिणाम युवकांच्या भवितव्यावर होऊ शकतो.   असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी यावेळी केले.  तसेच  सण, उत्सव काळात पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाय योजना व घेण्यात येणाऱ्या खबरदारीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी पेण, खालापूर,कर्जत, श्रीवर्धन येथील समिती सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच स्थानिक पातळीवर परिवहन विभाग, नगर परिषद, पोलीस विभाग आणि स्थानिक शांतता समितीच्या सदस्यांची समन्वय बैठक घ्यावी असे सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक