स्वच्छ रायगड जिल्हा जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर

स्वच्छ रायगड जिल्हा
जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा
सक्रीय सहभाग आवश्यक
                                                             - मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर


अलिबाग दि.09 (जिमाका) संपूर्ण रायगड जिल्हा आता स्वच्छ होण्याच्या अंतिम टप्प्यात असून त्यासाठी  स्वच्छतेची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या निमित्त होणाऱ्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयात केले.
 मुंबई विद्यापीठ, पीएनपी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी यांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय स्वच्छ भारत मिशन या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.बाबासाहेब बिडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक विजयकुमार सिंह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री, रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.डॉ.श्रीकांत तुपारे, उप प्राचार्या श्रीमती संजिवनी नाईक, स्वच्छ भारत मिशन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयंत गायकवाड, रविकिरण गायकवाड, सुनिल माळी आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ रायगड जिल्हा हे अभियान आरोग्यासाठीचा एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणून राबवावे. या अभियानासाठी विद्यार्थ्यांनी आपआपल्या भागामध्ये शासनाचे डोळे म्हणून काम पहावे. या अभियानाची जनजागृती प्रत्येकापर्यंत होणे आवश्यक असून त्यात आता आपली जबाबदारी वाढली आहे. आता शौचालय बांधणी व त्याचा वापर या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत. आज आपल्याकडे शौचालय नाही हा एक मोठा कलंक आहे. तो आता दूर व्हायलाच पाहिजे. आपल्या शेजारचे जिल्हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जर स्वच्छ होऊ शकतात तर रायगड का नाही ? याचा विचार करावा असे ते म्हणाले. आपल्याकडे काही ठिकाणी असे आढळून आले की, आर्थिक स्थिती चांगली असतानाही शौचालय न बांधण्याची मानसिकता आहे. आता ती बदलण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांनी जनजागृती करताना याचा विचार करावा. तसेच काही गावे दत्तक घेऊन ती स्वच्छ करण्याचा संकल्प करावा. सध्या रायगड जिल्हयातील 6 तालुके हागणदारी मुक्त झाले आहेत. उर्वरित 9 तालुके लवकरात लवकर हागणदारीमुक्त करणे हे एक आव्हान आहे. त्यासाठी समाजातील सर्वच स्तरावर सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छ रायगड जिल्हा अभियानासाठी रायगड जिल्हयाच्या सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी एन.एस.एस.च्या माध्यमातून निश्चितच अग्रेसर राहून कार्य करतील असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे एन.एस.एस. समन्वयक डॉ.बिडवे यांनी यावेळी व्यक्त केला. तर एन.एस.एस.चे विद्यार्थी शिस्तबध्द व परिणामकारकरित्या  या अभियानात सहभागी होऊन शासनाच्या सोबत सक्षमतेने कार्यरत होऊ शकतात असे डॉ.पाटोदकर यांनी सांगितले. कोणतेही राष्ट्रीय कार्य असो त्यात युवा पिढीचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो त्यामुळे स्वच्छ रायगड अभियानासाठी महाविद्यालयीन युवा वर्ग प्रभावी ठरेल असे विजयकुमार सिंह म्हणाले.
प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री यांनी महाविद्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांवर टाकलेली जबाबदारी ते निश्चितच पूर्ण करुन स्वच्छ रायगड जिल्हा अभियान मुदतीपूर्वच पूर्ण करतील, अशी ग्वाही उपस्थित पाहुण्यांना दिली.
विविध सत्र
या दोन दिवशीय कार्यशाळेत स्वच्छ भारत मिशन-एन.एस.एस.चे योगदान, आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज, स्वच्छ भारत मिशन संवादाची विविध माध्यमे, हागंणदारी मुक्त गाव मोहिम गरज व उपाययोजना, स्वच्छ भारत मिशन यशोगाथा सादरीकरण तसेच स्वच्छता अभियान क्षेत्रभेट आदि विषयांवर चर्चा सत्र होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.विक्रांत वार्डे व त्यांच्या सहकार्यांनी स्वागत गीत तथा एन.एस.एस. गीत सादर केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता कवी यांनी केले. तर आभार प्रदर्शन जयंत गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हयातील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक