अभिलेख जतन करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

दिनांक:- 15/03/2017                                                                                                   वृत्त क्र. 147
अभिलेख जतन करणे
 ही महत्वपूर्ण जबाबदारी
                                                        - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले


अलिबाग दि.15 (जिमाका) शासकीय कार्यालयातील अभिलेख जतन करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी असून संबंधितांनी त्याचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.
पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आयोजित अभिलेख व्यवस्थापन शाखा या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तसेच पुराभिलेख विभागाचे अभिलेखाधिकारी गणेश खोडके, राजकुमार वाघ, मुख्य छायाचित्रकार अनिल सावंत आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकरी तथा मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, शासकीय कार्यालयातील अभिलेखे हे अत्यंत महत्वाचे असतात. त्याची नेटकी विभागणी केली तर निश्चितपणे 50 टक्के जागा रिकामी होऊ शकते. जुन्या पारंपारिक पध्दती सोबतच नवीन अत्याधुनिक सुविधांची देखील माहिती घेऊन अभिलेख ठेवण्याचे कामकाज केले पाहिजे. अभिलेख जर व्यवस्थित नसतील तर  रद्दी व अभिलेख यातील फरक तो काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच पुराभिलेख संचालनालयाने नविन योजनांच्या अभिलेखा बाबत देखील मार्गदर्शन करावे. अशी सूचना केली. उपस्थितांनी आपल्या शंकाचे निरसण करुन अभिलेख संदर्भात कार्यालयात सुसज्ज ठेवावे असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमास जिल्हयातील महत्वाच्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी  प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक