सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या

24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त
सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या
       जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यांत येत आहे. यानिमित्त क्षयरोगाची माहिती व्हावी,क्षयरोग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी.  क्षयरोग नियंत्रणात राहण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही,तसेच क्षयरोगाची लागण होऊ नये आणि पुढील पिढी क्षयमुक्त व्हावी, यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबतची माहिती देणारा लेख…

            क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टूबरक्युलोसीस या जंतूमुळे होतो. या जंतूचा शोध डॉ.रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 24 मार्च 1882 रोजी लावला.या शोधाच्या एका शतकानंतर म्हणजेच 1982 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आणि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट् टूबरक्युलोसीस  अँड लंग डिसीज (IUATLD)यांनी 24 मार्च हा जागतिक क्षयरोग  रोग दिन म्हणून साजरा केला जाईल,असे जाहिर केले. तेंव्हापासून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जात आहे.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवडे किंवा जास्त काळ खोकला येणे.कधी कधी रक्तही पडणे, संध्याकाळच्यावेळी हलकासा येणारा ताप,भूक मंदावणे, वजनात घट होणे,अशक्तपणा वाटणे,छातीमध्ये दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे आहेत. रोग्याचे शिंकणे, खोकणे, थुंकणे या मार्गाने क्षयरोगाचे जंतू हवेत पसरतात. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना त्यापासून क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता असते.सुमारे 80टक्के रुग्ण फुफुसातील क्षयाचे असतात. उरलेले 20 टक्क्यात सांधे,हाडे,मणके,मेंदू,ह्दय,आतडे इ. अवयवांचा क्षयरोगाचा संबंध आहे. क्षयरोगाविरुद्धचा मुख्य लढा फुफुसातील क्षयरोगा विरुद्ध आहे. कारण एक थुंकी  दुषित रुग्ण उपचाराविणा राहील्यास वर्षभरात दहा ते पंधरा लोकांना क्षयरोगाचे संक्रमण करतो. म्हणून रोग प्रसार करणारे रुग्ण शोधून त्यास त्वरीत क्षयरोगविरोधी औषधोपचार सुरु करुन इतरांना होणारा संसर्ग लवकरात लवकर थांबविणे महत्वाचे.
संशयीत क्षयरोगी शोधणे:- सर्वसाधारण व्यक्तीमध्ये दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असलेली कोणतीही व्यक्ती, अति जोखमीच्या बाबतीत एक दिवसाचा खोकला असला तरी त्यास संशयीत क्षयरोगी म्हणून संबोधण्यात येते. यामध्ये उदा. थुंकी नमुना दुषित असलेल्या संपर्कातील व्यक्ती.,एच.आय.व्ही.बाधित व्यक्ती,मधुमेह व्यक्ती,वृद्ध व्यक्ती, कुपोषित बालके,फुफुसाचे इतर आजार असलेली व्यक्ती,उदा.सिलिकोसीस/दमा/अस्थमा प्रतिकार शक्ती कमी असलेली व्यक्ती,स्टेराईड घेणारी व्यक्ती,मुत्रपिंडाचे रोग असणारी व्यक्ती दिर्घकाळ धुम्रपान करणारी व्यक्ती,
उपचार पद्धती
            संशयीत क्षयरुग्णांचे दोन थुंकी नमुने (बेडका) तपासणी होणे महत्वाचे आहे. थुंकीत जंतू आढळले की, नवीन रुग्णास त्याच्या वजन गटानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत औषध सुरु केले जाते. दोन महिने संपल्यानंतर थुंकीची पुन्हा तपासणी केली जाते. चार महिने सातत्याने पुढील औषधोपचार घेतल्यास रुग्ण पूर्ण  बरा होतो. म्हणजेच रुग्णाला सहा महिने औषधोपचार घ्यावा लागतो. औषधोपचार काळात दोन वेळा थुंकीची तपासणी करुन अहवाल अदुषित आल्यास क्षयरोग्याला क्षयमुक्त घोषित करण्यात येते. क्षयरोगाचा औषधोपचार   मध्ये मध्ये थांबविल्यास ड्रग रेजिस्टंट (एम.डी.आर.टी.बी.) क्षयरोग होण्याची संभावना वाढते व  प्रमाण वाढवून क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यास कठीण होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यामध्ये 274 क्षयरुग्ण एम.डी.आर म्हणून उपचारावर आहे. ज्यांचा उपचाराचा कालावधी 24 ते 27 महिने असतो.
            थुंकीत जंतू आढळले नाहीत परंतु लक्षणावरुन टि.बी. असल्याचा संशय वाटल्यास क्ष-किरण तपासणी केली जाते. रुग्णांच्या औषधोपचारांमध्ये खंड पडू नये तसेच रुग्णाला जास्त अंतर चालू लागू नये म्हणून त्यांच्या घराजवळच प्रत्यक्ष नियंत्रणाखालीच देणारी प्रशिक्षित डॉटस् प्रोव्हायडरमार्फत रुग्णांचा उपचार करण्यात येतो.सर्व सरकारी दवाखान्यातून उपचार व तपासण्या विनामूल्य केल्या जातात.
एचआयव्ही/क्षयरोग- 99 डॉटस् उपचार
            एच.आय.व्ही. संक्रमण असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या व्यक्तीला क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते. या व्यक्तीमध्ये  दोन्ही आजार जलद गतीने वाढून रुग्णाचा मृत्यू लवकर ओढवला जातो. अशा एचआयव्ही बाधित क्षयरुग्णांना 99 डॉटस् पद्धतीने क्षयरोग विरोधी औषधे दिली जातात. यामध्ये रुग्णांमार्फत औषध घेतल्यानंतर संबंधित यंत्रणेला फोन करुन माहिती दिली जाते. त्यामुळे रुग्णांच्या औषधोपचाराची दररोज  माहिती  संकलित होते. त्यांनी औषधोपचार घेतला किंवा नाही हे कळते. व त्याचा फॉलोप ठेवला जातो. या उपचार पद्धतीमुळे क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण सात पटीने कमी झालेले आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी  क्षयरुग्णाचे निदान अथवा उपचार दिल्यास याबाबतची माहिती जवळच्या शासकीय रुग्णालयास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे क्षयरोग बाधित व्यक्तीची माहिती मिळते. फेब्रुवारी 2017 पासून रायगड जिल्हयात नव्याने डेल्ली डॉटस् औषध प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कार्यवाही
            क्षयरोग नियंत्रणात राहण्यासाठी आणि रुग्णांना तातडीने घराजवळ उपचार मिळावा यासाठी रायगड जिल्हयामध्ये 13 क्षयरोग पथके अलिबाग, कर्जत, महाड, माणगांव, पेण, पनवेल-1,पनवेल-2, रोहा, जसवली, उरण, खोपोली, पोलादपूर व सुधागड येथे स्थापन करण्यात आलेली आहेत.  सुधारीत राष्ट्रीय  क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दर 1 लाख लोकसंख्येमध्ये एक सुक्ष्मदर्शक केंद्र स्थापन करुन तज्ञ व प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञानाद्वारे क्षयरोग निदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक तालुकास्तरावरुन ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण तपासणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आदिवासी भागात याहूनही कमी लोकसंख्येच्या प्रमाणात रोग निदान केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.अशा प्रकारे रायगड ग्रामीण भागात एकूण 45 सुक्ष्मदर्शी केंद्राद्वारे क्षयरोग निदानाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 पर्यंत संशयीत  22283 रुग्णांची  बेडका तपासणी करण्यात आली. 1406 नवीन थुंकी दुषित रुग्ण आढळून आले.एकूण क्षयरोग रुग्ण 3538 आहेत तर सन 2015 मध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.12 टक्के आहे.
क्षयरोग म्हणजे मृत्यू अटळ असे पूर्वी मानले जात असे.क्षयरोग झालेल्या व्यक्तीला समाजापासून दूर ठेवले जायचे परंतु,आता औषधोपचारामध्ये झालेल्या क्रांतीमुळे क्षयरोग पूर्ण बरा होतो. त्यासाठी रुग्णांनी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तपासणीसाठी घाबरुन तपासणी न करता चिंता करण्यापेक्षा तपासणी करुन रोग नसल्याची खात्रीकरुन निर्धास्त रहाणे महत्वाचे आहे. पुढील पिढी क्षयमुक्त् व्हावी,यासाठी  क्षयरोग विरुद्ध लढ्यात  प्रयेकाने सहभाग घेऊन या रोगाविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून यावर्षीच्या क्षयरोग दिनानिमित्त सर्वजण मिळून क्षयरोग संपवू या असे घोषवाक्य जाहिर करण्यात आले आहे.
0000000
           संकलन
           जिल्हा माहिती कार्यालय

          रायगड-अलिबाग 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक