राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर

राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त
                                                         - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर

            अलिबाग दि.23 (जिमाका), राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे भविष्यकाळासाठी उपयुक्त असून विविध शिबिरातून मिळणारी ज्ञानाची व संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरते असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी आज येथे केले.
मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीनविरा येथील विश्रामगृह येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय निवासी शिबिराच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री, उप प्राचार्य प्रा.संजीवनी नाईक, कार्यक्रमाधिकारी प्रा.प्राजक्ता कवी, प्रा.विक्रांत वार्डे, लक्ष्मी शालिनी महाविद्यलय पेझारीचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दिलीप पाटील, प्रा.तेजस म्हात्रे , प्रा.नम्रता पाटील आदि उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना डॉ.पाटोदकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मिळणारे अनुभव हे आपणास सदोदित उपयुक्त ठरतात. असे स्वानुभवावरुन सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा केवळ मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांसाठी न ठेवता तो समाजसेवेसाठी मिळालेली संधी समजून नोंदवावा. या शिबिरातून सामाजिक एकता  राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव रुजण्यासाठी मदत होते तसेच समाजासाठी काही तरी करण्याची उमेद मिळते. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.अग्निहोत्री म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी दिलेला सहभाग हा वेळेचा अपव्यय नसून भविष्यातील सुसंधीची मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणूकीचा लाभ विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चित होतो. महाविद्यालयाने कोणत्याही शिबिरासाठी विद्यार्थ्यांना पाठविले तर विद्यार्थ्यानी कारणे न सांगता या शिबिराचा लाभ स्वयंस्फुर्तीने घ्यावा. आपल्या महाविद्यालयाचे, जिल्हयाचे नाव अधिक उज्वल करावे.
17 मार्च ते 23 मार्च या सात दिवसाच्या  निवासी शिबिरात स्वच्छ भारत मिशन, जंगल सफर, जैव‍ विविधता उद्यान भेट, तरुणांसाठी आहाराचे  नियोजन, बँक क्षेत्रातील व्यवसायांच्या संधी, योग प्रशिक्षण, सेवाभावी संस्थासोबत संवाद, सामाजिकतेतून आर्थिक बांधिलकी, क्षय रोग जागृती, आरोग्य विषयक दुर्लक्षित समस्या, विज्ञान जागृती असे उपक्रम राबविण्यात आले.
प्रमुख अतिथीच्या हस्ते शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्राजक्ता कवी यांनी केले तर प्रा.विक्रांत वार्डे यांच्या एन.एन.एस. स्फुर्तीगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या शिबिराला रायगड जिल्हयातील विविध महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक