दिलीप पांढरपट्टे यांना पी.एच.डी. रायगड जिल्हयातील भूसंपादनावर संशोधन

दिनांक :-7 मार्च 2017                                                                 वृत्त क्र.119
 दिलीप पांढरपट्टे यांना पी.एच.डी.
रायगड जिल्हयातील भूसंपादनावर संशोधन

 अलिबाग, दि.07 (जिमाका) :-   धुळे जिल्हयाचे जिल्हाधिकारी  तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी,  दिलीप पांढरपट्टे यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने नुकतीच पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
 रायगड जिल्हयातील सार्वजनिक प्रकल्पांच्या भूसंपादनांचे सामाजिक -आर्थिक परिणाम या विषयावर डॉ. पांढरपट्टे यांनी संशोधन करुन प्रबंध सादर केला होता. त्यास समाजशास्त्रातील विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली. या संशोधनासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील समाजशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. विजय मारुलकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सन 1981 ते सन 2014 या कालावधीत बी.एस.सी., बी.एड, एल.एल.बी., एल.एल.एम., एम.बी.ए. अशा विविध शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी संवर्गात निवड होवून सन 1987 मध्ये ते उपजिल्हाधिकारी पदावर शासकीय सेवेत आले. सन 2000 मध्ये त्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती मिळाली व त्यानंतर 27 मार्च  2015 च्या अधिसूचनेव्दारे ते भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त झाले. सन 2013 ते ऑगस्ट 2016 या कालावधीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड ही पदे भुषविली. 11 ऑगस्ट 2016 पासून ते धुळे जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.दिलीप पांढरपट्टे, यांची मराठी गजलांचे  ' शब्द झाले सप्तरंगी ',  'मराठी गजल :  दिलीप पांढरपट्टे ', कुळकायद्यातील घरठाण हक्काबाबत  'राहिल त्याचे घर'  तसेच ' घर वाऱ्याचे पाय पाऱ्याचे '  'कथा नसलेल्या कथा', ' बच्चा लोग ताली बजाव',   'शायरी नुसतीच नाही',  'सव्वाशे बोधकथा भाग-1 व भाग-2'  अशी विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच दैनिक सकाळ (मुंबई) मध्ये बोधकथा या सदरातून पाचशे बोधकथा प्रसिध्द झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या मराठी व उर्दू गजलांच्या सी.डी. ही प्रकाशित झाल्या आहेत.
डॉ.पांढरपट्टे यांना पी.एच.डी. मिळाल्याने त्यांचे विविध स्तरावरुन  तसेच रायगड जिल्हयातील हितचिंतक, स्नेही व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
                                              000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक