महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे

महिला संरक्षण कायदा
अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक
                         --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे

अलिबाग(जिमाका), दि.9:- महिला संरक्षण विषयक असलेले कायदे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचवून योग्य त्यावेळी त्यांना त्याचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयक कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला  पोलिस उप अधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,जेष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या ॲड.निहा राऊत, ॲड.महेश ठाकूर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
            मार्गदर्शन करतांना, डॉ. गोटे पुढे म्हणाले की, सध्या महिलांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीचे चुल आणि मूल हे बंद झाले असून पुरुषांच्या बरोबरीने महिला समाजात वावरत आहेत. त्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची अशी आहे. महिलांविषयक असलेल्या कायद्याची त्यांना सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रसार माध्यमे सक्षमतेने कार्यरत आहेतच तथापी अन्य मार्गाने देखील  या कायद्यांचा प्रसार प्रचार अधिक होणे आवश्यक आहे. महिलांच्या संरक्षणासाठीचे हे कायदे समजून घ्या त्याचा दुरुपयोग करु नका. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस उप अधिक्षक राजेंद्र दंडाळे यांनी हा कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून सकारात्मक विचार करणारी कार्यशाळा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. समाजातील मोठ्या वर्गाला कायद्याची माहिती नाही.त्यामुळे आधी  कायद्याची माहिती घ्या, कायद्याचा सन्मान करा असे ते म्हणाले. पोलीस विभागामार्फत दामिनी पथकाच्या माध्यमातून, मुलींची होणारी छेडछाड टाळण्याबाबतची कार्यवाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण मार्गदर्शन
या एक दिवसीय कार्यशाळेत महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन आहे.यात प्रामुख्याने पार्श्वभूमी आणि मार्गदर्शक तत्वे- वक्ते- ॲड.निहा राऊत, विशाखा मार्गदर्शक तत्वे-वक्ते श्रीम. संध्या कुलकर्णी, जबाबदाऱ्या व कौशल्य- वक्ते श्रीम.एस.एम.वाघमारे, छळाचे स्वरुप  व कारणे वक्ते-श्रीम.सुप्रिया जेधे, समुह चर्चा (पॅनल डिस्कशन)
0000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक