देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत. --- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

दिनांक :-08/04/2017                                                                                                        वृत्त क्र.188
देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम
पतसंस्था करत आहेत.
                           --- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार


अलिबाग दि. 8 :- (जिमाका)     बँक असो की पतसंस्था या औद्योगिक व व्यापारी क्षेत्रासाठी काम करत असतात. देशाला आर्थिकदृष्टया सशक्त करण्याचे काम पतसंस्था करत आहेत असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन , वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. अलिबाग येथील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महौत्सवी वर्ष  सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हाणून ते बोलत होते.
            अलिबाग येथील जयमाला गार्डन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, जे.एन.पी.टी.चे विश्वस्त महेश बादली, संस्थेचे संस्थापक गिरीष तुळपुळे, पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली ओक, रघुजीराजे आंग्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर जैन, ॲड.महेश मोहिते, कमळ नागरी पंतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी, तसेच ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते.
            मंत्रीमहोदय पुढे म्हणाले की, पतसंस्था किंवा वित्तीय संस्था या रक्तवाहिण्यासारखे काम  करीत असतात. त्या देशाच्या आर्थिक जडण-घडणीत महत्वाची भुमिका पार पाडतात. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी मुद्रा सारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. पंतप्रधानांच्या स्वप्नातला भारत घडविण्याचे काम पतसंस्था करीत आहेत असेही ते म्हणाले.
            कमळ नागरी पतसंस्थेने गेली 25 वर्ष आर्थिक क्षेत्रात उत्तम काम केले आहे. ही संस्था 100 टक्के कर्ज वसुली करणारी संस्था आहे.हेच संस्थेचे मोठे यश आहे. आर्थिक क्षेत्रात काम करत असतांना ही संस्था सामाजिक सेवा करण्याचे कामही करत आहे. जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी पतसंस्था काम करत आहे. कमळ नागरी पतसंस्थेचे  रुपांतर बँकेत होऊन एक वटवृक्ष व्हावा अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते पतसंस्थेच्या ए.टी.एम. केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यक्रमानंतर संस्थेने विद्यानगर येथे बांधलेल्या विश्रामगृहाचे उदघाटन मंत्रीमहोदयांच्या हस्ते झाले.
               आमदार प्रशांत ठाकूर मार्गदर्शन करतांना म्हणाले, पतसंस्थेची आजवरची वाटचाल ही सभासदांच्या आत्मीयतेमध्ये आहे. कोकणात सहकार कसा वाढू शकतो हे कमळ नागरी पतसंस्थेने दाखवून दिले आहे. येणाऱ्या काळात कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात ही संस्था आदर्श घडवेल असे सांगून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
               संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ओक यांनी पतसंस्थेची सुरु असलेली वाटचाल याबाबत थोडक्यात माहिती दिली. तर संस्थेचे संस्थापक गिरीष तुळपुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात 25 वर्षाचा इतिहास सर्वांसमोर मांडून कोकणात या पतसंस्थेने चांगला नावलौकिक मिळविल्याचे सांगून राज्य तसेच देश पातळीवर सन्मान झाल्याचे सांगितले .
            प्रारंभी मंत्रीमहोदयांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजली ओक यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस सतिश पाटील यांनी केले.
                                                                      0000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक