रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त होईल -- राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त होईल
                                                                -- राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

        अलिबाग दि. 11:- (जिमाका)   रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने रायगड किल्ला विकास आराखडयास मंजूरी दिली असून यामधून रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास  बंदरे, वैद्यकिय शिक्षण,माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.
            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 337 व्या पुण्यतिथी निमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती महाड यांनी किल्ले रायगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्रारंभी मंत्रीमहोदय तसेच अन्य मान्यवरांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, महाड पंचायत समितीचे सभापती सिताराम कदम,  कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख,श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदिश कदम, सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, ले.जनरल राजू कानिटकर, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराचे मानकरी पांडुरंग बलकवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
              छत्रपती शिवाजी महाराज यांनी पारदर्शक कारभार कसा असावा हे दाखवून दिले. तसेच त्यांनी सुराज्य करुन दाखविले. असे सांगून मंत्रीमहोदय म्हणाले की, शासन गड किल्ल्याचे संवर्धन करत असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आजच्या युवा पिढीनेही   किल्ले रायगडचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
              यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी गेली 122 वर्ष मंडळामार्फत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.
              याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना यावर्षीचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार मंत्रीमहोदयांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज लक्ष्मणराव पासलकर, बाळासाहेब पासलकर,पंढरीनाथ पासलकर,राजाभाऊ पासलकर,मुकंदराव पासलकर यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले.गडारोहण स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली.
             
                                                       00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक