आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

आपत्ती व्यवस्थापन संदर्भात
प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी
-जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

       अलिबाग, (जिमाका)दि.8:-येत्या मान्सुनमध्ये जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर  मदत व बचाव कार्य तत्परतेने  होण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व संबंधित  प्रशासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सून-2017पूर्वतयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रांताधिकारी श्रीमती सुषमा सातपुते, रविंद्र बोंबले,बाळासाहेब तिरके, प्रविण पवार,अमरसिंग भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी,जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक,तसेच तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, व संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत केल्यास आपत्ती काळात त्याचा निश्चितच चांगला उपयोग होऊन प्रसंगी जिवीत व वित्त हानी टाळता येऊ शकते.  मात्र सर्व संबंधितांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे.मोबाईल बंद ठेवू नये,पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाने वेळोवेळी मागितलेली माहिती तातडीने देण्यात यावी,असे सांगितले.
तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या क्षेत्रात उद्भवणाऱ्यासंभाव्य आपत्कालीन परिस्थितीनुसार आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करावा, त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरही तेथील परिस्थितीनुसार आपत्ती आराखडा तयार करावा. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करुन आपदग्रस्तांना मदत देणे महत्वाचे असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील असलेली बचाव वा मदतकार्याबाबतची साधनसामुग्री सुस्थितीत आहे याची खातरजमा करावी.
          जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा तसेच रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. स्थलांतरीत आपदग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा सुस्थितीत ठेवाव्यात. त्यामध्येही आवश्यक ती दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पुरेसे अन्न धान्याचा योग्य पुरवठा होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने योग्य नियोजन करावे. तसेच तहसिलदारांनी त्यांच्या क्षेत्रातील सर्व गोदामांचा आढावा घेऊन ती सुस्थितीत ठेवावीत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठीही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने योग्य ती दक्षता घ्यावी.जलसंधारण विभागाने धरणांच्या संदर्भात जागरुकता दाखवून ती सुरक्षित आहेत याची खात्री करावी.गतवर्षी झालेल्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात असलेले पूल सुरक्षित असल्याबाबत सार्वजनिक विभागाने प्रमाणपत्र द्यावे.योग्य्‍ त्या सर्व ठिकाणी सर्व संबंधितांनी संपर्क व नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी व तसे जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावे. जिल्ह्यातील सर्व  ठिकाणची पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत ठेवावेत अशाही सूचना त्यांनी दिल्या.
प्रतिबंधात्मक उपाय
                   जिल्हा पोलीस अधिक्षकांनी बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांवर असलेल्या अपघात प्रवण भागाबद्दल प्रत्यक्ष संबंधित ठिकाणावरील छायाचित्रांच्या आधारे माहिती देवून राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधितांकडून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचना दिली त्यानुसार त्याभागाची पोलीस यंत्रणेसह संयुक्त पहाणी त केली जाईल व प्रतिबंधात्मक  उपाययोजना करण्यात येतील.
          या बैठकीला सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण, आरोग्य, जलसंपदा,जलसंधारण मेरीटाईम बोर्ड,राष्ट्रीय महामार्ग विभाग,मत्स्य् विभाग आदीचे अधिकारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक