प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा --जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना
अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
                                          --जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर


अलिबाग,(जिमाका) दि.20:-प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना लघू,मध्यम् व्यापाऱ्यांसाठी महत्वपूर्ण असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील गरजूंनी मोठ्या प्रमाणात घेवून आपला व्यापार अधिक वृधिंगत करावा यासाठी या योजनेची माहिती जिल्ह्यात सर्वदूर पोहचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज येथे दिल्या.
            मुद्रा कार्ड योजना प्रसार, प्रचार व समन्वय समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या  या योजनेची माहिती असलेल्या चित्ररथाचा शुभारंभ व घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज  जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी समितीचे समन्वयक जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,तहसिलदार महसूल जयराज देशमुख,तहसिलदार (सामान्यशाखा) आण्णाप्पा कनशेट्टी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर,माहिती अधिकारी विष्णू काकडे आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतनू साकारलेली ही योजना अत्यंत महत्वाची असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात या योजनेनी मोठी आघाडी घेतली आहे.जिल्ह्यातील जवळपास 200 गावांमध्ये मुद्रा योजनेची माहीती असलेले चित्ररथ फिरणार आहेत.जिल्ह्यातील छोट्या-छोट्या व्यवसाय धारकांनी आपला व्यवसाय वाढीसाठी तसेच नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेचा आवश्य लाभ घ्यावा.         जिल्ह्यातील राष्ट्रीय तसेच खाजगी बँकाकडून मुद्रा लोन घेण्याची व्यवस्था आहे.विशेषत: महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            समितीचे समन्वयक तथा जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी यावेळी बोलतांना नियोजन विभाग व वित्त् मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानून ही योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीच्यावतीने विविध माध्यमातून प्रसार,प्रचार व प्रसिद्धी करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.



घडी पत्रिकेचे प्रकाशन
            प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना प्रसार प्रचार व समन्वय समितीच्यावतीने मुद्रा कार्ड योजनेविषयक माहिती असलेली तीन फोल्डची आकर्षक घडीपत्रिका तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या घडीपत्रिकेत मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे मुद्रा बँक योजनेबाबतचे विचार, लाभार्थ्यांना आवाहन, मुद्रा कार्डच्या शिशू, किशोर तरुण कर्ज योजनेची माहिती, मुद्रा कार्डची वैशिष्ट्ये,समिती  तसेच जिल्ह्याची प्रगती आदींची माहिती आहे.
            उपरोक्त चित्ररथ तसेच मुद्रा कार्ड योजना माहिती असलेले पथनाट्य एस.टी बस वरील जाहिरात फलक,बसस्थानकावरी ऑडिओ जिंगल्स, घडीपत्रिका,घडीपुस्तिका,सिनेमागृहातील जाहीराती आणि लघुपट तसेच  मेळावे या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र या योजनेची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक