4 कोटी वृक्ष लागवड जिल्हयाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक - जिल्हा‍धिकारी पी.डी.मलिकनेर

वृत्त क्र.337                                                                                                    दिनांक:-22 जून 2017
4 कोटी वृक्ष लागवड
जिल्हयाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी
सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक
                                                                               - जिल्हा‍धिकारी पी.डी.मलिकनेर
            अलिबाग दि.22 (जिमाका), चार कोटी वृक्ष लागवड ही महत्वाची मोहिम असून रायगड जिल्हयाचे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी सर्व घटकांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज येथे केले. चार कोटी वृक्ष लागवड संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी प्रांताधिकारी पेण श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड विठ्ठल इनामदार, रोहा रविंद्र बोंबले तसेच उपवन संरक्षक रोहा विजय सुर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, अधिक्षक कृषि अधिकारी के.बी.तरकसे, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प पेण गजेंद्र अहिरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
            मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, रायगड जिल्हयासाठी एकूण 10 लाख 59 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून 11 लाख 18 हजार वृक्ष लागवड करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी रोहा व अलिबाग वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, अन्य विभाग व रायगड जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत यांच्या मार्फत लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, प्रसार माध्यमे, नागरीक यांच्या मदतीने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. शासकीय विभागांनी केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून या अभियानाकडे न पाहता स्वत:चे काम समजून स्वत:ला आनंद मिळण्यासाठी तसेच निरोगी भावी पिढीसाठी या वृक्ष लागवड मोहिमकडे गांर्भीयपूर्वक पहावे व उद्दिष्टपूर्तीचा आनंद मिळवावा असे आवाहन त्यांनी केले.
15 लाख रोपे उपलब्ध
 या वृक्ष लागवडीसाठी विविध विभागामार्फत जिल्हयात 15 लाख झाडे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने खैर, जांभूळ, शिवण, करंज, आवळा, बेहळा, आपटा, हिरडा, सिताफळ, कुडूलिंब, पळस, साग, कांचन, पेरू, डाळिंब, पिंपळ, शिसम, चिंच, बेल, काजू, सावर, कुसुम, गुलमोहर विविध 45 प्रजातींची रोपे आहेत. यांची लागवड करुन 90 टक्केपेक्षा अधिक वृक्ष जगविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या करीता विविध कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या नावाने झाड लावून ते झाड जगविण्याचा आनंद द्यावा व वृक्ष्‍ा लागवड मोहिम यशस्वी करा असे आवाहन त्यांनी केले.
वन महोत्सव
तसेच संपूर्ण जिल्हयात 1 ते 7 जुलै दरम्यान शासनाच्या विविध विभाग व लोकसहभागातून वन महोत्सवाची ही मोहिम राबविण्यात येत आहे. या करीता प्रामुख्याने 1 जुलै रोजी मा.खासदार, मा.आमदार, मा.सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने वृक्षलागवड मोहिम सर्व तालुक्यात, गांवामध्ये राबविण्या संदर्भात नियोजन करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा उपनिबंधक, सा.बां., जि.प. नगरपरिषद, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, पाटबंधारे, विद्युत महामंडळ, पोलीस, उत्पादन शुल्क, आदि विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन वृक्ष लागवडी संदर्भात त्यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
000000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक