रायगड जि. प. चा अभिनव उपक्रम

लेख क्र. 22                                                                                                        दि.13.6.2017
रायगड जि. प. चा अभिनव उपक्रम
होय, मी सुध्दा जि. प. शाळेतच शिकलो
 
जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम,शिक्षणाचा दर्जा,देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा याची माहिती देण्याबरोबरच जि.प.शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी जिल्हा परिषद रायगड मार्फत राबविण्यात येणारा अभिनव उपक्रम… होय, मी सुध्दा जि. प. शाळेतच शिकलो  या विषयी थोडक्यात…
            नुकत्याच  शाळा सुरु झाल्या आणि मुलांसोबत पालकांचीही धांदल सुरु झाली. नवीन वर्गात प्रवेश केलेला विद्यार्थी आणि त्याच्यासोबतच विद्यार्थी दशेत गेलेले पालक असे एकूण चित्र जवळपास सर्वत्र दिसून येते.  अगदी ग्रामीण भागात हमखासपणे हेच चित्र आहे.  तर शहरी भागामध्ये यात काहीसा बदल आपणास दिसून येतो तो म्हणजे अगदी नर्सरी, के. जीत प्रवेश घेण्यासाठी देखील परिसरातील उत्तमोत्तम असलेली शाळा निवडण्याची  धांदल दिसून येत आहे.  
            पण आमच्या रायगड जिल्ह्यात मात्र एक वेगळाच अभिनव उपक्रम रायगड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर स्वतःच हे ठामपणे सांगताहेत की, होय, मी सुध्दा जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. मग तुम्ही का नाही. या उपक्रमाची ही ओळख.....
            रायगड जिल्ह्यातील पालकांना स्वतःच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन  जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा दाखलाच नार्वेकर सर देत आहेत. प्रिय पालकांनो तुमच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवा आपली जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळांच्या तुलनेत कोठेही कमी नाही किंबहुना ती अधिक सोयींयुक्त आहे.  एक आगळा वेगळा उपक्रम या वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी शेषराव बडे राबवित आहेत. या अभिनव उपक्रमातील पत्र पुढीलप्रमाणे-
पालकांना पत्र
प्रिय पालक,
            आपली मुलं हीच खरं तर आपली संपत्ती ! त्यांच्यासाठी आपण दिवसरात्र काबाडकष्ट करीत आहात.  आपल्या मुलांनी खुप शिकाव, मोठ व्हावं आणि आपल्या कुटुंबाचं पर्यायाने देशाचं नाव मोठं करावं असं आपलंही स्वप्न असेल ना ?  हे स्वप्न् निश्चितपणे साकार होईल.  मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य शाळेची निवड करायला हवी.  विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतुन शिक्षण घेणे, शिक्षण शास्त्राच्या दृष्टीकोनातून योग्य  आहे हे शिक्षणतज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञांनी सिध्द करुन दाखविले आहे.  आपल्या महाराष्ट्रात सर्वोच्च पदावर पोहचलेले असंख्य अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, खेळाडू, इंजिनिअर्स, कलाकार, साहित्यिक व लोकप्रतिनिधी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकले असल्याचे त्रिवार सत्य आहे.
            आता तर त्यात अधिक भर पडून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे रुप पूर्णपणे बदलून गेले आहे.  डिजिटल क्लासरुम, कृतीयुक्त्‍  अध्यायन, विविध खेळ, स्पर्धा परिक्षांची पुर्वतयारी, सहशालेय व अभ्यासपुरक ज्ञानरचनावादी उपक्रम, याबरोबरच मुल्यशिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते.  आपल्या शाळेत 1100 टक्के प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित शिक्षक व सुसज्ज इमारती उपलब्ध आहेत.  शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, शालेय गणवेश, रुचकर मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, प्रवास भत्ता, शिष्यवृत्ती व निवडक शाळेत संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जातो.  आपल्या शाळांमध्ये अध्ययन अध्यापनामध्ये ज्ञानरचनावाद व एबीएल,या आधुनिक पध्दतीचा वापर केला जात आहे.  त्यामुळे विद्यार्थी स्वतः शिकण्यासाठी प्रेरीत होत असून तो आज स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करीत आहेत.  म्हणून मी आपणास नम्र आवाहन करतो की, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये त्याचा प्रवेश निश्चित करावा..!           जिल्हा परिषदांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासन सदैव प्रयत्नशील राहिलेले आहे. अगदी कोकण विभागात तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस शाळेसाठी  हा उपक्रम राबवून शाळेचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्नही झालेला आहे. यात रायगड जिल्हा अग्रेसर होताच. तसेच आपणास माहित आहे की, शासनामार्फत यासाठी जे प्रयत्न करण्यात आले त्यात बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे.  प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतियुक्त अध्ययन पध्दती (एबीएल), डिजिटल शाळासिध्दी मानांकन, अशा  उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु आहे. शंभर टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती, तसेच गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, मध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना जिल्हा  परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत.  शासकीय तसेच जिल्हा परिषद स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा लोकाभिमुख होण्यास भरीव मदत झालेली आहे.  विद्यार्थी हितासाठी शासन सर्वतोपरी योगदान देत आहे. केवळ मोठ्या शाळेत प्रवेश घेतल्याने विद्यार्थी मोठा होत नाही त्यासाठी अभ्यास व त्याची मेहनत तसेच योगय्  वातावरण असणे देखील आवश्यक असते.  त्यासाठी अतिशय महत्वाचा हा उपक्रम रायगड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.
     मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी लिहिलेले पत्र वाचले असता निश्चितच या उपक्रमाचे महत्व व त्यामागे असलेली भावना  लक्षात येते. अशा प्रकारचे उपक्रम जिल्हा परिषदेच्या मार्फत राबवून रायगड जिल्ह्यातील पालकांमध्ये  जागृती करता येईल, ही बाब खरोखरच अभिनंदनीय व अनुकरणीय आहे. सीईओ साहेब आपले मनपूर्वक अभिनंदन.. !
संकलन: 
डॉ. राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी,रायगड अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक