रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज-डॉ.राजू पाटोदकर

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com
फेसबुक :-dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad
विशेष लेख क्र.24                                                                                            दिनांक :- 23/06/2017

(26 जून सामाजिक न्याय दिनानिमित्त लेख)

रयतेचा राजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
        राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे 26 जून. हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लौकिकास शाहू महाराजांचे कार्य हे दिपस्तंभासारखे असून त्यांनी त्याकाळी घेतलेले निर्णय आजही दूरदृष्टीची साक्ष देतात.
            राजर्षी शाहू महाराजांनी सुमारे 100 वर्षापूर्वी घेतलेले निर्णय हे लोकाभिमुख, लोकोपयोगी असे होते. ज्याची उपयुक्तता आजही आपणास दिसून येते. सुक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन असलेल्या या राजांनी लोकसेवांचा नवा आदर्श निर्माण केला. त्याबद्दलचा हा लेख. .... 
महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तीन महान व्यक्तींमुळे आपणास सामाजिक  न्यायाचा पाठ अनुभवयास मिळातो. सामाजिक समतेची एक मोठी शिकवण यांनी आपणास दिली. यातील प्रत्येकाचे कार्य हे आभाळापेक्षाही मोठे आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी, उन्नतीसाठी जे-जे काही करता येईल त्या-त्या बाबींकडे अत्यंत जागरुकतेने लक्ष देऊन त्याची पूर्तता करण्याचे काम केले. शिक्षण, सामाजिक समता, जाती निरपेक्षता यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही खूप वेगळी व तेजस्वी होती. शिक्षण, समाज, धर्म, हक्क, अर्थ अशा विविध घटकांचा विचार करून राजर्षी शाहू महाराज लोकसेवा करीत असत.
सडेतोड विचार
इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यास अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याची चळवळ वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मनात रुजविली गेली. याबाबत नेते मंडळींनी आपले विचार मांडले. राजर्षी शाहू महाराजांनी देखील ही गुलामगिरी नष्ट करण्यासाठी डोळस नेतृत्वाची गरज असल्याचा विचार मांडला.  केवळ विचारच नव्हे  तर स्वत:च्या अखत्यारीतील भागात म्हणजे करवीर इलाख्यात त्याची अंमलबजावणीदेखील केली. त्यासोबत रयतेच्या कल्याणासाठी विविध योजनांची आखणी करुन त्या प्रत्यक्षात अंमलात देखील आणल्या. त्या काळी त्यांनी घेतलेले निर्णय हे किती अचूक व महत्वपूर्ण होते हे ते आता वाचले तरी लक्षात येतात. लोकांच्या हिताचे, लोकांच्या कल्याणासाठी, सामाजिक न्यायाची आस असलेले हे निर्णय आहेत.
शिक्षणाचे महत्व त्यांनी पूर्णत: ओळखले आणि 24 जुलै 1917 रोजी एक निर्णय जाहीर केला. तो म्हणजे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, "येत्या गणेश चतुर्थी पासून करवीर इलाख्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचे आहे. सध्या असलेल्या सर्व प्राथमिक शाळांतील फी सदर दिवसापासून माफ करण्यात येत आहे." प्राथमिक शिक्षणामुळे होणारी समाजातील बालकांची उन्नती ही किती महत्वपूर्ण आहे हे ओळखूनच त्यांनी शिक्षण मोफत तर केलेच पण त्यासाठीही सक्तीही केली. काहीही झाले तरी आपल्या इलाख्यातील ही पिढी शिकली पाहिजे, हुशार झाली पाहिजे तरच ते संघर्ष करु शकतील अशी त्यांची भावना असावी. आजही या निर्णयाला तितकेच महत्व आहे.
वक्तशिरपणा
कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वक्तशिरपणे कार्यालयात यावे याबाबत त्यांनी  साधारणत: एप्रिल 1920 दरम्यान एक महत्वपूर्ण आदेश काढला. हा आदेश म्हणजे "कोल्हापूर शहरातील सर्व ऑफीसांतील लोक वक्तशीर कचेरीस आले न आले हे समजण्याकरिता जी डायरी रोज हुजूर येते ती पाठविताना योग्य प्रकारे भरण्याची खबरदारी घेण्यात येत नाही व त्यामुळे निष्कारण आवक जावक कामे चालवावी लागतात. तसेच डायरीची घरे कोरी राहिल्याने ज्यांची घरे कोरी राहिलेली ते लोक उशीरा आले असे समजून त्यास दंड झाल्यावर ते किरकोळ रजेवर कामगारीवर कामात दुसऱ्या ऑफिसात किंवा इतर प्रकारे बाहेर होते असे लिहून येते व त्यावरुन दंड माफ होण्याबद्दल कामे चालतात. असे अनेक वार आढळून आल्याने सर्वास समजण्याकरीता हुकूम गॅझेटमध्ये प्रसिध्द करण्यात येत आहे व यापुढे त्या असे बिनचूक अंमल होण्याचे आहे."
आजही शासकीय अथवा काही खाजगी कार्यालयातून, कंपनीतून कामावर वेळेत येण्याबाबतच्या सूचना दिल्या जातात, आदेश काढले जातात, त्याची अंमलबजावणी होते. राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळी काढलेला हा आदेश किती महत्वाचा आहे.


आरोग्य
आपल्या रयतेच्या प्रती या राजाची किती आस्था होती अथवा त्यांच्या सुख दु:खाशी ते किती समरस होऊन राज्यकारभार करत होते, त्याचे एक सजीव उदाहरण म्हणजे वैद्यकीय क्षेत्राबाबत महाराजांनी काढलेला हा छोटासा आदेश. हा आदेश वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी होता. या आदेशात ते म्हणतात   "एखादा ऑफिसर काम करुन कितीही थकलेला असो त्याने रोगी येताच त्याची सोय केलीच पाहिजे. हा नियम मेडिकल खात्यातील अगदी वरिष्ठ अधिकारी व ड्रेसर किंवा नर्स ह्या सर्वांना लागू आहे. मेडिकल खात्यात हल्ली नोकर असलेल्या व पुढे नोकर होणाऱ्या प्रत्येक इसमाला ह्या हुकूमाची नक्कल देण्यात यावी व नेहमीच्या उपयोगासाठी दवाखान्याच्या ऑफिसात एक नक्कल टांगून ठेवण्यात यावी." रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाची व्यवस्थितरित्या काळजी घेऊन त्यावर उपचार केले जावेत हा त्यामागील महत्वाचा हेतू.
पाणीटंचाई
            केवळ आपली रयतच नव्हे तर राज्यात असलेले मुके प्राणी यांच्याकडेही शाहू महाराजांचे लक्ष होते. इलाख्यातील मुक्या जनावरांच्या रक्षणासाठी दुष्काळाच्या काळात त्यांनी घेतलेला पुढील निर्णय हा महाराजांच्या उदात्ततेची साक्ष देणारा आहे. 20 जानेवारी 1900 च्या करवीर गॅझेटमध्ये असलेला हा निर्णय "चालू साली पाण्याची व चाऱ्याची कमताई झाल्यामुळे करवीर इलाख्यातील गरीब लोकांस आपली शेतकीची व इतर जनावरे रक्षण करणे बरेच जड जाईल, त्यांचे पोषणकरिता काही तजवीज करणे योग्य आहे. म्हणून ज्यांना आपली जनावरे पोसण्याचे सामर्थ्य नसेल त्यांनी ती सरकारी थट्टी मुक्काम कोल्हापूर, पदमाळ्यानजीक येथे डॉक्टर सखाराम बाजी कुलकर्णी यांचेकडे आणून पोचवावी." असे अनेक लोकाभिमुख निर्णय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेऊन आपल्या प्रजेपोटी असलेले राजाचे प्रेम दाखवून दिले आणि लोकांचा, रयतेचा राजा म्हणून आपली कारकिर्द जनसेवार्थ अर्पिली.
राजर्षी शाहू महाराज यांनी आपले विचार लोकांच्या समोर अत्यंत प्रखरतेने व प्रगटपणे मांडले. त्यांच्या प्रत्येक भाषणातून लोकांच्याप्रती, समाजाच्याप्रती असलेला त्यांचा आप्तपणाचा भाव स्पष्टपणे दिसून येतो. अशाच एका भाषणाच्या प्रसंगी ते म्हणतात, आपण मला आज, आपला असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शेवटपर्यंत प्रेम दृढ ठेवा मी देखील कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी त्याला न जुमानता उन्नतीच्या महात्कार्यास शक्य तेवढा हातभार लावण्यास कधीही माघार घेणार नाही. त्यामुळेच बहुजन समाजाचे उध्दारक, शिल्पकार, समाजोपयोगी कायद्याचे जनक अशी किती तरी विशेषणे त्यांना दिली तरी ती कमी पडतील.
 लोकाभिमुख निर्णयांद्वारे  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या प्रजेपोटी असलेले राजाचे प्रेम दाखवून दिले आणि म्हणूनच रयतेचा राजा असा नावलौकिक त्यांना प्राप्त झाला.

संदर्भ-
1)     क्रांतीसूक्ते राजर्षी छत्रपती शाहू- संपादक डॉ.एस.एस.भोसले.
2)     राजर्षी एक व्यक्तिमत्व- श्याम येडेकर.
---------------------
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक