किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न

किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा
लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न
            अलिबाग दि.6, (जिमाका), किल्ले रायगडावर आज 344 वा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
            खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास विविध गडावरुन आणलेल्या पाण्याने तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज शहाजीराजे तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे  आदि मान्यवर व देशभरातून उपस्थित लाखो शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
            शिवभक्तांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे यांनी सांगितले की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे. ही आनंदाची बाब आहे. तथापी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवंत स्मारक असलेले गडकिल्ले जतन करण्याचे काम प्रथम झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी रायगडच्या संवर्धनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या संवर्धन रायगडचे या शिवभक्तांच्या परिसंवादात जवळपास 1200 प्रश्न उपस्थित झाल्याचे ते म्हणाले. रायगडच्या संवर्धनात शिवभक्तांनी वर्षातून दोन वेळा श्रमदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रायगड देशवासीयांचा आत्मा
            नुकतेच सेवानिवृत्त झालेले कोकण महसूल आयुक्त तथा किल्ले रायगड संवर्धनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर देशमुख यांनी या मार्गदर्शन करताना सांगितले की, रायगड किल्ला हा तमाम देशवासीयांचा आत्मा असून या किल्ल्याच्या संवर्धनाकरीता शासनाने 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून संवर्धनाचे काम सुरु आहे. शिवसमाधीचा डोंब दुरुस्त करण्यात आला असून किल्ल्यावरील  तलावांची स्वच्छता करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची त्यांनी माहिती दिली. या संवर्धन आराखडयामध्ये परिसरातील गावांचा विकास आराखडा देखील तयार केल्याचे ते म्हणाले. शासनामार्फत रायगड किल्ला संवर्धनाचे कार्य  चांगल्या पध्दतीने सुरु आहे. त्याद्वारे रायगडचे शिवकालीन वैभव पुन्हा जोमाने उभे  राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचंड जल्लोषात शिवराज्याभिषेकाचा लोकोत्सव रायगड किल्ल्यावर साजरा झाला. यात ढोल, ताशे यांचा गजर तसेच पारंपारिक पध्दतीने वेशपरिधान केलेले शिवभक्त आदिंचा उत्साह होता. पहाटे 5 वाजता शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. नगरखान्या समोर ध्वजारोहण करण्यात आले. शाहीरी कार्यक्रम मोठया जल्लोषात झाले. तसेच विविध मर्दानी खेळ, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड